'या' गोष्टींमुळे कुटुंबात वाढेल गोडवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 03:09 PM2019-05-21T15:09:02+5:302019-05-21T15:15:30+5:30

कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो अशी अनेकांची तक्रार असते. मात्र यामुळे कुटुंबातील सदस्यासोबत दुरावा निर्माण होऊ शकतो. येणाऱ्या पिढीला कुटुंबाचं महत्त्व पटवून द्यायचं असेल तर काही गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. छोट्या छोट्या गोष्टीमुळे कुटुंब मजबूत होतं. अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

कुटुंबातील माणसांचं आपल्या आयुष्यातील महत्त्व नीट समजून घ्या. त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवा. काही दिवसानंतर विरंगुळा म्हणून सहलीचं आयोजन करा.

स्वत: चा विचार करण्याआधी कुटुंबाचा विचार करा. आई ज्याप्रमाणे कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेते. त्यांना जेवण देते आणि नंतर शेवटी स्वत: जेवते. त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाचा सर्वात आधी विचार करा.

आपल्या माणसांशी प्रेमाने संवाद साधा. जर कुटुंबातील सदस्यांकडून एखादी चूक झाली तर त्यांना ती समजावून सांगा. यामुळे कुटुंबातील सदस्यांशी असलेले नाते आणखी घट्ट होईल.

घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींशी आदराने वागा. त्यांचा मान राखा. तसेच लहान मुलांना शिस्त लावा. त्यांना चांगल्या सवयीचे महत्त्व पटवून सांगा.

वाद झाल्यास कुटुंबातील व्यक्तीवर आपण चिडतो. तर कधी राग आल्याने अबोला धरतो पण असं करू नका यामुळे दुरावा आणखी वाढू शकतो. त्याऐवजी त्या व्यक्तींना माफ करायला शिका. तसेच आपलं काही चुकलं तर माफी मागा.

घरामध्ये अनेक काम असतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना कामात मदत करावी. यामुळे कोणत्याही एका व्यक्तीवर कामाचा अतिरिक्त ताण येणार नाही.

लहान मुलांकडून एखादी चूक झाली की त्यांना ओरडलं जातं. मात्र मुलांना ओरडू नका तर त्यांना त्यांच्या चूका नीट समजावून सांगा. मुलांसोबत मोकळेपणाने संवाद साधा. त्यांना त्याचं मतं मांडण्याची संधी द्या.