पुण्यातील मृत्यूतांडवाची भीषणता दाखवणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 11:00 AM2019-06-29T11:00:52+5:302019-06-29T12:56:24+5:30

पुण्यात रात्री दिडच्या सुमारास कोंढवा परिसरात भिंत कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला आहे. आल्कर स्टायलस ही इमारत उंचावर असून तिची संरक्षक भिंत दगडाने बांधलेली होती. ही संरक्षक भिंत खाली असलेल्या मजुरांच्या घरावर कोसळली.

या भिंतीच्या खालच्या बाजूला मजूरांसाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजूला पोकलेनचा वापर करुन खोदकाम करण्यात येत होते.

घटनास्थळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली असून प्रथमदर्शनी या घटनेत बिल्डर, कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवला असल्याचं दिसतंय मात्र या घटनेची संपूर्ण चौकशी करू असं सांगितले आहे. मृत मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारमधून आल्याचं सांगितलं जातं.

पुण्यातील या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवेदना व्यक्त केली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत.

रात्री दिडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तसेच या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत असा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे. तर महापौर मुक्ता टिळक, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर यांनीही घटनास्थळाची पाहणी केली

मृतांच्या कुटुंबीयांना शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :पुणेPune