लोकसभेच्या 'मेगा फायनल'आधी मोदींचे 'हे' सहा शिलेदार 'अनफिट'; भाजपा कसं जमवणार गणित?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 02:59 PM2019-01-17T14:59:05+5:302019-01-17T15:04:59+5:30

भाजपा अध्यक्ष अमित शहांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाली आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू आहेत. शहांना निवडणुकीच्या रणनितीची उत्तम जाण आहे. मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच शहा यांची प्रकृती बिघडली आहे.

केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी श्वास घेताना त्रास होत आहे. त्यामुळे ते गेल्या सोमवारी एम्समध्ये उपचारांसाठी दाखल झाले होते. बुधवारी त्यांनी एम्सच्या आयसीयूमधून प्रायव्हेट वॉर्डमध्ये हलवण्यात आलं.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर कर्करोगानं त्रस्त आहेत. गेल्या वर्षी जवळपास तीन महिने पर्रिकर उपचारांसाठी अमेरिकेत होते. यानंतर दिल्लीतील एम्समध्येही त्यांच्यावर उपचार झाले. अकरा महिन्यांपासून ते आजारी आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी ते ड्रिप लावून सचिवालयात पोहोचले होते.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलीदेखील आजारी आहेत. एप्रिल 2018 मध्ये त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. 14 मे 2018 रोजी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी जेटली यांच्या खात्याचा प्रभार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे होता. जेटली यांना कर्करोग झाल्याचं निदान कालच झालं. त्यानंतर ते उपचारांसाठी न्यूयॉर्कला रवाना झाले.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे आगामी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये स्वराज एम्समध्ये उपचार घेत होत्या. स्वराज यांनी त्यांची किडनी खराब झाल्याची आणि डायलिसिसवर असल्याची माहिती ट्विट करुन दिली होती.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याही प्रकृतीच्या तक्रारी सुरू आहेत. गेल्या महिन्यात एका कार्यक्रमात गडकरी अचानक बेशुद्ध झाले. त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी झालं होतं. याआधी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना दिल्लीत संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी ते भोवळ येऊन पडले होते.