ज्यांना गुरू म्हणाले होते, त्याच शरद पवारांवर मोदींनी का केला 'स्ट्राईक'?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 06:53 PM2019-04-02T18:53:02+5:302019-04-02T19:05:18+5:30

महात्मा गांधी यांचं वर्ध्याशी असलेलं नातं आणि भाजपाची विदर्भातील ताकद लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा सोमवारी वर्ध्यात घेतली. या सभेत त्यांच्या रडारवर राहिले, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार. पुतण्यानंच पवारांची दांडी गुल केली, असा टोला लगावत, ज्या कौटुंबिक कुरबुरींची कुजबूज होती, त्या मोदींनी जाहीरपणे चर्चेत आणल्या. पवार मैदान सोडून पळाल्याची टिप्पणीही त्यांनी केली. वास्तविक, शरद पवारांना मोदींनी राजकीय गुरू म्हटलं होतं. अनेक विषयांवर त्यांचा सल्ला घेत असल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे, प्रचाराच्या पहिल्यावहिल्या सभेत अन्य कुठल्याही नेत्यावर न बोलता, त्यांनी थेट पवारांवर स्ट्राईक केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. पण, मोदींनी हे सगळं अगदी विचारपूर्वक केलंय आणि त्यातून बरेच संदेशही दिलेत.

लोकसभेत उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक खासदार निवडून जाणारे राज्य महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसला एक सर्वमान्य चेहरा नसल्यामुळे किंवा त्यांना अनुल्लेखाने मारण्यासाठी शरद पवार यांच्यावरच हल्ला करण्याचे भाजपाचे धोरण आहे.

लोकसभेच्या १९९८ च्या निवडणुकांत शरद पवार यांनीच समीकरण जुळवून महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीच्या ३७ जागा निवडून आणल्या होत्या. यंदाच्या निवडणुकांतही शरद पवार यांनी राष्ट्रवादीबरोबर काँग्रेसचीही जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे त्यांनाच भाजपा टीकेचं लक्ष्य करेल.

शरद पवार हे तडजोडीच्या राजकारणासाठी प्रसिद्ध आहेत. अगदी उद्योगपतींपासून ते राजकीय नेत्यांपर्यंतचे वाद मिटवितात असे म्हटले जाते. मात्र, घरातीलच भांडणे त्यांना मिटविता येत नाही, हे दाखवून देण्याचा प्रयत्न मोदींनी केला.

देशात मोदींविरोधात विविध पक्षांची आघाडी करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. विरोधी पक्षांची बैठक त्यांच्याच निवासस्थानी झाली होती. विरोधी पक्षांनाही शरद पवार यांच्याबाबत संभ्रमित करणे, हाही त्यांच्यावरील 'स्ट्राईक'मागचा हेतू असू शकतो.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या राजकारणात अजित पवार यांचा गट असल्याचे बोलले जाते. या दोन गटांत आता थेट लढाई होणार असल्याचे सांगून कार्यकर्त्यांना सैरभैर करण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची असू शकते.

आत्तापर्यंतचा गृहकलहांचा इतिहास पाहिला तर घरातील बंडखोर विरोधी पक्षाला जाऊन मिळतो, असे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रवादीच्या या गृहकलहात अजित पवार वेगळी भूमिका घेऊ शकतात, असे दर्शविण्याचा प्रयत्न असू शकतो.

विदर्भातील राजकारणात इतर मागासवर्गीय समाजगटांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी शरद पवार यांच्यावर टीका करण्याचे धोरण असू शकते.