बुद्धिबळाच्या पटावर मांडला प्रेमाचा डाव....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 09:57 AM2018-10-01T09:57:54+5:302018-10-01T10:00:52+5:30

जॉर्जीया येथे सुरू असलेली 43वी चेस ऑलिम्पियाड स्पर्धा वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. याला एक भारतीय कारणीभूत आहे. या स्पर्धेत एका भारतीय पत्रकाराने चक्क एका महिला खेळाडूला प्रपोज केला. विशेष म्हणजे एकमेकांच्या भाषेची माहिती नसतानाही या दोघांच्या प्रेमाचे अंकुर फुलले..

भारताचा पत्रकार निकलेश जैन या स्पर्धेच्या वार्तांकनासाठी जॉर्जियात दाखल झाला. त्याने तेथे कोलंबियाची महिला ग्रँड मास्टरर एंजेला लोपेझला सामना सुरू होण्यापूर्वी लग्नाची मागणी घातली. एंजेलाने होकार कळवताच संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

33 वर्षीय निकलेश हाही बुद्धिबळपटू आहे आणि तो मध्यप्रदेशचा राहणारा आहे. बार्सिलोना येथील एका स्पर्धेत एंजेला आणि निकलेश यांची भेट झाली होती. या दोघांमध्ये बुद्धिबळाचा सामनाही झाला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली.

एंजेला भारतातही आली होती आणि तेव्हा तिने निकलेशच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर चेस ऑलिम्पियाडमध्ये एंजेलाला प्रपोज करण्याचा निर्णय निकलेशने घेतला.

एंजेलाला प्रपोज करण्यासाठी तिच्या बहिणीने निकलेशची मदत केली. एकमेकांची भाषा माहित नसल्याने निकलेशने प्रपोज करण्यासाठी गुगल ट्रान्सलेटरचा वापर केला.