Asian Games 2018: आशियाई स्पर्धेत यांच्याकडून पदकाची आशा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2018 12:22 PM2018-08-18T12:22:25+5:302018-08-18T12:34:49+5:30

राष्ट्रकुल स्पर्धेतील यशानंतर भारतीय खेळाडू आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई स्पर्धेत आपला दबदबा वाढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. इंडोनेशियाच्या जकार्ता शहरात 18वी आशियाई स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारतीयांना खेळाडूंकडून प्रचंड अपेक्षा आहेत. भारताने या स्पर्धेसाठी 572 खेळाडूंचा चमू पाठवला आहे आणि हे खेळाडू सर्वोत्तम कामगिरीच्या निर्धाराने दाखल झाले आहेत. आशियाई स्पर्धेत भारताला काही प्रमुख खेळाडूंकडून पदकाच्या अधिक अपेक्षा आहेत. चला तर जाणून घेऊया त्या खेळाडूंबद्दल...

बजरंग पुनिया: हरयाणाच्या या 24 वर्षीय कुस्तीपटूने 2014च्या आशियाई स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. 2018 मध्ये त्याने तीन जेतेपदांवर नाव कोरले आहे आणि त्याचा सध्याचा फॉर्म पाहता 65 किलो फ्रीस्टाइल वजनी गटात तोच प्रबळ दावेदार आहे.

सुशील कुमारः ऑलिम्पिक स्पर्धेतीत सर्वात यशस्वी कुस्तीपटू म्हणून त्याची ओळख आहे. मात्र, त्याच्या सध्याच्या कामगिरीवर आणि आशियाई स्पर्धेच्या पात्रता फेरीतही सुट दिल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे दोन ऑलिम्पिक पदकं नावावर असलेल्या या खेळाडूवर प्रचंड दबाव असणार आहे.

विनेश फोगाटः रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दुखापतग्रस्त झालेली ही कुस्तीपटू पुनरागमनासाठी सज्ज आहे. तिने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे आणि महिलांच्या 50 किलो वजनी गटात ती प्रबळ दावेदार आहे.

पी. व्ही. सिंधूः जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटूकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

सायना नेहवालः आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये भारताला यशाची उंची गाठून देणारी ही खेळाडू आपल्या अनुभवाच्या जोरावर आशियाई स्पर्धेत करिष्मा करू शकते.

किदम्बी श्रीकांतः राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक पटकावणाऱ्या खेळाडूकडून भारताला पुरूष एकेरीत पदकाची अपेक्षा आहे. श्रीकांतसमोर चीन, इंडोनेशिया आणि जपानच्या खेळाडूंकडून कडवे आव्हान मिळू शकते.

रोहन बोपन्नाः अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसच्या माघारीनंतर पदकाची जबाबदारी या खेळाडूवर आली आहे. तो दिविज शरणसोबत पुरूष दुहेरीत पदक पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मनू भाकेरः हरयाणाच्या या 16 वर्षीय नेमबाजने अल्पावधीत आंतरराष्ट्रीय स्पर्धांत वर्चस्व गाजवले आहे. तिने राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे आणि 10 मीटर एअर पिस्तुलमध्ये तिच्याकडून पदक अपेक्षित आहे.

हिमा दासः नुकत्याच झालेल्या जागतिक ( 20 वर्षांखालील) स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत ऐतिहासिक सुवर्ण जिंकणाऱ्या या खेळाडूकडे संपूर्ण देशवासियांच्या नजरा खिळल्या आहेत.

नीरज चोप्राः आशियाई स्पर्धेत हा भालाफेकपटू ध्वजधारकाची भूमिका पार पाडणार आहे. त्याने 20 वर्षांखालील जागतिक स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते.

शिवा थापाः पुरूषांच्या 60 किलो वजनी गटात बॉक्सर शिवा थापा पहिले आशियाई पदक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सलग तीन पदकं जिंकल्याने त्याचा आत्मविश्वास उंचावला आहे.

सोनिया लाथेरः एससी मेरी कोमच्या अनुपस्थितीत जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या या महिला बॉक्सरवर पदक पटकावण्याची जबाबदारी आहे. ती 57 किलो वजनी गटात प्रतिनिधित्व करणार आहे.

दीपा कर्माकरः दुखापतीतून पूर्णपणे सावरलेल्या जिम्नॅस्टपटूने वर्ल्ड चॅलेंज स्पर्धेत सुवर्णपदकासह कमबॅक केले.

मनिका बत्राः राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या या टेबल टेनिसपटूने सर्वांचे लक्ष वेधले आहे.