...म्हणून भारतातील या राज्यांमध्ये वारंवार येतो पूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:25 PM2019-07-16T13:25:40+5:302019-07-16T14:44:20+5:30

सध्या पूर्वोत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये महापुराने थैमान घातले आहे. प्रत्येक पावसाळ्यात भारतातील काही राज्यांना महापुरांचा फटका बसतो. या महापुराचा धोका कमी व्हावा यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी नद्या जोड प्रकल्प सुरू करण्याची योजना तयार केली होती. मात्र अद्याप ती पूर्णत्वास जाऊ शकलेली नाही. आज जाणून घेऊयात भारतातील विविध राज्यांत येणाऱ्या पुराची कारणे.

बिहारच्या उत्तर भागाला दरवर्षी महापुराचा फटका बसतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे नेपाळमधून वाहत येणाऱ्या नद्या आहेत. नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडला की त्याचे पाणी वाहत बिहारमध्ये येते. त्यामुळे सीमांचल, मुझफ्फरपूर, शिवहर, पूर्व चंपारण्य या जिल्ह्यांना पुराचा फटका बसतो.

महाराष्ट्रातील एका भागात दरवर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असते, तर राजधानी मुंबईसह कोकणामध्ये पावसाळ्यात पूर येतो. मुंबईतील पाणी साचण्यासाठी येथील पर्जन्यवाहिन्यांची योग्य सफाई नसणे हे मुख्य कारण आहे. तसेच कोकणामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने पावसाळ्यात वारंवार पूरस्थिती निर्माण होते.

आसाममधील पुरस्थितीचे मुख्य कारण हे येथे कोसळणारा मुसळधार पाऊस आणि नद्यांचे पाणी वाढते. बह्मपुत्र आणि त्याच्या उपनद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुरस्थिती निर्माण होते. धेमाजी, लखीमपूर, बिश्वनाथ, नलबाडी, चिरांग, गोलाघाट, माजुली, जोरहाट, दिब्रुगड, नगांव, मोरीगांव, कोक्राझार, बोंगाईगाव, बक्सा, सोनितपूर, दर्रांग आणि बारपेटा या जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसतो.

त्रिपुरा आणि मिझोराम या पूर्वोत्तरेतील राज्यांमध्येही मुसळधार पावसामुळे येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी हजारो रहिवाशांना फटका बसतो. तसेच या राज्यांचा रेल्वेमार्गाने देशातील इतर राज्यांशी असलेला संपर्क तुटतो.

उत्तर प्रदेशमध्येही मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण होते. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढून अनेक गाव जलमय होतात. गंगा आणि तिच्या उपनद्यांसोबत शरयू, गोमती, घाघरा या नद्यांच्या किनाऱ्यावरील गावांना पुराचा अधिक फटका बसतो.

बहुतांश पर्वतीय क्षेत्र असलेल्या जम्मू काश्मीरलाही पुराचा फटका बसतो. या राज्यात 2014 मध्ये मोठा महापूर आला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन शेकडो गावांना फटका बसला होता. येथे पुरस्थिती निर्माण होण्याचे महत्त्वाची कारणे म्हणजे मुसळधार पाऊस, ढगफुटी, नद्या आणि तलावांचे अतिक्रम, भूस्खलन आणि हवामानातील बदल ही आहेत.