पाहा, 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची भव्यता; सरदार पटेलांच्या पुतळ्याची खास बात!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 12:42 PM2018-10-30T12:42:50+5:302018-10-31T11:19:36+5:30

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं काम पूर्ण झालं आहे. सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2013 मध्ये पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला होता. पुढील चार वर्षांत लॉर्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीला काम करण्यास देण्यात आले. या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन अॅन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचालित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती.

'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे.

लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून पुतळा तयार करण्यात आला आहे. 18,500 टन रेनफोर्स स्टील, 6,500 टन स्ट्रक्चरल स्टील, 1,700 टन आणि अनेक धातूंचा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' साठी वापर करण्यात आला आहे.

भूकंप अथवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'चे नुकसान होणार नाही अशापद्धतीने संरचना करण्यात आली आहे. तसेच पुतळा तयार करण्यासाठी तब्बल दोन कोटी 25 लाख किलो सिमेंटचा वापर करण्यात आला आहे.

गुजरातचं मुख्य शहर अहमदाबादपासून साधारण 200 किमी अंतरावर सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा उभारण्यासाठी 3500 कामगार आणि 250 इंजिनिअर दिवस-रात्र मेहनत घेत होते.

थ्री स्टार हॉटेल, म्युझियम, ऑडिओ-व्हिज्युअल गॅलरीदेखील उभारण्यात आली आहे. गॅलरीपर्यंत पोहचता यावे यासाठी पर्यटकांसाठी दोन वेगवान प्रवासी एलिव्हेटर्स आहेत. सरदार पटेलांचे जीवनचरित्र मांडताना या स्मारकाच्या माध्यमातून पर्यटन वाढीला पुरक अशी मांडणी करण्यात आली आहे.

प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची रचना केली आहे. स्मारकातील पटेलांच्या पुतळ्यात 200 लोक बसू शकतील अशी प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीतून सातपुरा आणि विध्यांचल डोंगररांगातील नर्मदा नदीचे खोरे आणि सरदार सरोवराचा परिसर पाहता येणार आहे.