प्रियंका-राहुलचा रोड शो सुपरहिट; पण उत्तर प्रदेशात काँग्रेससमोर कठीण आव्हान

By बाळकृष्ण परब | Published: February 11, 2019 04:08 PM2019-02-11T16:08:50+5:302019-02-11T16:29:01+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे केलेला रोड शो सुपरहिट झाला. त्याबरोबरच प्रियंका गांधी यांची प्रत्यक्ष राजकारणातील एंट्रीही दणक्यात झाली.

प्रियंका गांधीं यांच्या रोड शोमुळे उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली आहे.

प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशामुळे तसेच त्यांनी पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी स्वीकारल्याने उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा बाळगली जात आहे.

मात्र प्रियंका गांधी यांच्या सक्रियतेनंतरही उत्तर प्रदेशात काँग्रेससमोर कठीण आव्हान असणार आहे.

उत्तर प्रदेशात काँग्रेसची संघटना खूपच कमकुवत आहे. 1989 साली उत्तर प्रदेशच्या सत्तेतून बाहेर झाल्यानंतर काँग्रेस पक्ष राज्यात उत्तरोत्तर कमकुवत होत गेला आहे. सध्या उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या 2 आणि विधानसभेच्या केवळ 7 जागा त्यांच्याकडे आहेत.

उत्तर प्रदेशात दलित आणि मुस्लिम हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार बसपा आणि सपा या प्रादेशिक पक्षांकडे वळला आहे. तर सर्वण मतदार दीर्घकाळापासून भाजपाच्या मागे उभा आहे. त्यामुळे पक्षापासून दुरावलेल्या मतदारांना पुन्हा काँग्रेसकडे वळवताना प्रियंका गांधी यांची कसोटी लागणार आहे.

2022 साली होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार करण्याची तयारी काँग्रेसकडून सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र राज्यात आधीच भक्कम असलेला भाजपा आणि आता नव्याने झालेली सपा-बसपा महाआघआडी यांना शह देण्यासाठी प्रियंका गांधी यांना मोठ्या प्रमाणावर पक्ष बांधणीचे काम हाती घ्यावे लागणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक पातळीवर लोकप्रिय ठरतील असे चेहरे काँग्रेसकडे नाहीत. त्यांचे अनेक नेते गेल्या काही वर्षांत सपा, बसपा आणि भाजपाच्या आश्रयाला गेले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत तुल्यबळ उमेदवारांचा शोध घेताना प्रियंका गांधी यांची दमछाक होणार आहे. एकंदरीत आज रोड शो द्वारे प्रियंका गांधी यांचे उत्तर प्रदेशमधील राजकारणात धमाकेदार आगमन झाले असले तरी त्यांना पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आव्हानांचा डोंगर पार करावा लागेल.