बलात्कारी बाबा ! आसारामच नव्हे, या बाबांबरही झाले बलात्काराचे आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 01:27 PM2018-04-25T13:27:01+5:302018-04-25T13:27:01+5:30

आश्रमातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आसाराम बापू याला आज जोधपूर येथील न्यायालयाने दोषी ठरवले. त्यामुळे बापुला शिक्षा होणार हे आता निश्चित झाले आहे. मात्र बलात्कार प्रकरणी शिक्षा झालेला आसाराम बापू हा एकमेव बाबा नाही. याआधीही अनेक बाबांना बलात्कार प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे.

गुरमीत राम रहीम - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम यालाही आश्रमातील साध्वीवर बलात्कार केल्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले आहे. त्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली आहे. तो सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

स्वामी परमानंद - तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील आश्रमामधील स्वामी परमानंद हा सुद्धा 13 महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात बंद आहेत. त्याच्यावर श्रीलंकेतील एका तरुणाच्या हत्येचाही आरोप आहे. या बाबाचा एक सेक्स व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता.

स्वामी नित्यानंद - बंगळुरू- म्हैसूर महामार्गावर ध्यानदीपम नावाचा आश्रम चालवणारा स्वामी नित्यानंद दक्षिणेत प्रसिद्ध आहे. 2010 साली या नित्यानंद बाबाची एका अभिनेत्रीसोबतची सेक्स सीडी व्हायरल झाली होती. त्यानंतर या प्रकरणात नित्यानंद बाबाला तुरुंगवासही झाला होता. मात्र नंतर त्याला जामीन मिळाला होता.

भीमानंद महाराज - चित्रकुट परिसरातील चमरोहा गावात राहणाऱ्या भीमानंद महाराजावर सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप झाला होता. त्यानंतर या बाबाला अटकही करण्यात आली होती. पण तुरुंगातून सुटल्यावर स्वत:ला अवतार घोषित करून त्याने भक्तीचा बाजार मांडला आणि कोट्यवधीची माया गोळा केली.