मोदींनी गृहमंत्री म्हणून अमित शहांना का निवडलं?... 'ही' आहेत सहा प्रमुख कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 04:12 PM2019-05-31T16:12:08+5:302019-05-31T16:21:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले ५७ शिलेदार गुरुवारी निवडले. राष्ट्रपती भवनातील शानदार सोहळ्यात या सर्वांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यानंतर आज मोदी सरकार - २ चं बहुचर्चित खातेवाटप जाहीर झालं. सगळ्यांच्या नजरा ज्यांच्यावर खिळल्या होत्या, त्या अमित शहा यांच्याकडे महत्त्वाच्या गृहखात्याची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. या धाडसी निर्णयामागे नेमकी काय कारणं असू शकतात?, याचा आढावा घेऊ या.

भाजपाच्या अजेंड्यातील अनेक मुख्य मुद्दे हे गृहखात्याशी संबंधित आहेत. मग, तो अयोध्येतील राम मंदिराचा विषय असो किंवा ३७० कलम रद्द करण्याचा. त्या संदर्भात मोदी सरकार-2 ला ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मोदींनी आपला अत्यंत विश्वासू शिलेदार गृहमंत्री म्हणून निवडला आहे.

गृहमंत्री झाल्यानं अमित शहा यांचा समावेश 'कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी'मध्ये होणार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी, अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल अशी चौकडी एकत्र काम करू शकणार आहे.

अमित शहा यांना गुजरातच्या गृहमंत्रिपदाचा अनुभव आहे. धडाकेबाज गृहमंत्री अशीच त्यांची तेव्हा ओळख होती. सध्या देशात नक्षलवादाची मोठी समस्या आहे. तिच्याशी दोन हात करताना शहांसारखा कणखर गृहमंत्री महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असा विचारही मोदींनी केला असावा.

राष्ट्रीय नागरिक नोंदणी, पूर्वोतर राज्यातील अशांतता, जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती हे देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय आहेत. मोदी-शहा जोडीची व्हेव्हलेन्थ, विचार जुळत असल्यानं ते या विषयांवर रोखठोक भूमिका घेऊ शकतात.

येत्या काही महिन्यात येऊ घातलेली दिल्ली विधानसभेची निवडणूक आणि २०२१ मध्ये होणारी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून मोदींनी शहांची निवड केलेली असू शकते.

प्रशासनावर वचक ठेवण्याच्या दृष्टीनेही अमित शहा यांचा दरारा उपयुक्त ठरू शकतो.

गृहमंत्रिपद अमित शहा यांना देतानाच, मोदींनी गृहराज्यमंत्रिपदासाठीही आपल्या अत्यंत विश्वासातील व्यक्ती निवडली आहे. ती म्हणजे, तेलंगणातील खासदार जी. किशन रेड्डी. मोदी संघ स्वयंसेवक असल्यापासून जी. किशन रेड्डीशी त्यांची ओळख आहे. या दोघांनी १९९४ मध्ये एकत्र अमेरिका दौराही केला होता. त्यामुळे हिंदुत्व हाच सरकारचा अजेंडा असेल, हेही मोदींनी स्पष्ट केलं आहे.