'घर घर मोदी'नंतर आता साडीवर मोदी, सूरतच्या बाजारात आली 'लाट'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 04:01 PM2019-02-14T16:01:04+5:302019-02-14T16:06:50+5:30

आगामी लोकसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकण्यास सुरूवात झाली. काँग्रेस आणि भाजपाकडून त्याची जय्यत तयारीही सुरू असल्याचं दिसतंय. तर, भाजपाकडून यंदाही जाहिरातीबाजीचे नवनवीन फंडे वापरण्यात येत आहेत. नुकतेच बाजारात मोदी साडी दाखल झाली असून ती चांगलीच चर्चेतही आली आहे.

लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाचा प्रचार फंडा जोमानं काम करणार असल्याचं दिसून येतंय. कारण, यापूर्वी मोदींच्या नावाने टी-शर्ट, टोप्या आणि मास्क छापण्यात आल्याचे आपण पाहिले.

नुकतेच फिर एक बार मोदी सरकार असे लिहिण्यात आलेले टी शर्टही आपण पाहिले आहेत. मात्र, आता बाजारात मोदींचे छायाचित्र असलेली साडी दाखल झाली आहे. या साडीची बाजारासह राजकीय वर्तुळातही चांगलीच चर्चा रंगली आहे.

गुजरातच्या सुरतमधील एका व्यापाऱ्याने मोदींच्या चेहऱ्याचे प्रिंटींग असलेली ही साडी डिझाईन केली आहे. विशेष म्हणजे, ही साडी महिलांच्याही मोठ्या पसंतीस उतरली आहे. या साडीचे फॅब्रिक अतिशय चांगलं असल्याचं सांगण्यात येत आहे.

सध्या या साडीमध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आणि रंग उपलब्ध आहेत. मात्र, ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता, आणखी रंग व डिझाईन बनविले जाण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे या साडीची क्रेझ लक्षात घेऊन आगामी काळात प्रियंका गांधींच्याही साडीचे डिझाईन लवकरच बाजारात उपलब्ध होऊ शकते, असे साडी विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचा फंडा म्हणून भाजपासाठी ही साडी मार्केटींगचं महत्वाच साधन बून शकते. तर निवडणुकांच्या प्रचारासाठी अजून कुठं कुठं मोदी पाहायला मिळणार आहेत, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.