भाजपाचे हे वाचाळवीर मोठ्या मताधिक्यासह पोहोचले लोकसभेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 02:57 PM2019-05-26T14:57:54+5:302019-05-26T15:13:02+5:30

नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर 300 जागांचा टप्पा ओलांडला. या निवडणुकीत भाजपाचे अनेक उमेदवार मोठ्या मताधिक्यासह विजयी झाले. विशेष बाब म्हणजे वाचाळवीर म्हणून ओळख असलेले भाजपाचे काही नेतेही मोठ्या मताधिक्यासह विजयी झाले. अशा उमेदवारांचा घेतलेला हा आढावा.

वाचाळणा आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे गिरिराज सिंह बिहारमधील बेगुसराय मतदारसंघामधून सुमारे 4 लाख 22 हजार 217 मतांनी विजयी झाले. त्यांनी डाव्या पक्षांच्या कन्हैया कुमार यांचा पराभव केला.

आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादाला तोंड फोडणारे कर्नाटकमधील भाजपा नेते अनंतकुमार हेगडे उत्तर कन्नड मतदारसंघामधून 4 लाख 79 हजार 649 मतांनी विजयी झाले.

गेल्या पाच वर्षांत आपल्या वक्तव्यांनी सरकार आणि भाजपाला वारंवार अडचणीत आणणारे साक्षी महाराज हे उत्तर प्रदेशमधील उन्नाव मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यासह विजयी झाले. त्यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार अरुण शंकर शुक्ला यांच्यावर चार लाख 956 मतांनी मात केली.

ऐन निवडणुकीत शहीद हेमंत करकरे आणि महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या प्रज्ञा सिंह यांच्यावर या वक्तव्यांचा काहीही परिणाम झाला नाही. उलट भोपाळ मतदारसंघातून त्या 3 लाख 64 हजार 822 मतांनी विजयी झाल्या.