आयएएस अधिकाऱ्याचा असाही साधेपणा...ना ढोलताशे, ना वरात...आयआरएस मुलगी आणली घरात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 09:47 PM2019-02-08T21:47:19+5:302019-02-08T21:52:53+5:30

आयएएस किंवा आयआरएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचे लग्न म्हणजे राजकीय नेत्यांपासून हौशानवश्यांचा गोतावळाच असतो. शिवाय मोठे स्टेज, सजावट आणि दिमतीला अख्खा फौजफाटा असतोच. मात्र, गाजियाबादच्या एका आयएएस प्रशिक्षणार्थीने त्याच्यासोबत प्रशिक्षण घेणाऱ्या आयआरएस मुलीशी अत्यंत साधेपणाने लग्न केले आहे. यामुळे पैशांची मोठी उधळण करत धामधुमीत लग्नाचा बार उडवून देणाऱ्या राजकारण्यांपासून, बिल्डर, उद्योजकांना एक धडा घालून दिला आहे.

ना बँडबाजा नाही वरात, या अधिकाऱ्यांच्या लग्नात केवळ त्यांचे आई-वडील आणि काही जवळचे मित्र, नातेवाईक. एवढ्यांच्याच साक्षीने त्यांनी अत्यंत साधेपणाने आधी मंदिरात लग्न करून नंतर गाझियाबादमधील तहसिलदार कार्यालयात जाऊन लग्नाची नोंदणी केली.

कवीनगरमध्ये राहणारे नवीन कुमार चंद्र हे 2017 च्या बॅचचे आएएस अधिकारी आहेत. तर मुलगी राजस्थानची सुजानगडगावातील अंजना कुमारी या आयआरएस अधिकारी आहेत. दोघांचेही मसुरी येथील अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरु आहे.

प्रशिक्षणादरम्यान त्यांच्यात प्रेमबंध निर्माण झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, धुमधडाक्यात लग्न न करता त्यांनी साधेपणाने लग्न केले. यामागे एकच कारण होते, ते म्हणजे समाजासमोर आदर्श घालून देण्याचे.

नको तेवढा खर्च केल्याने वधुपक्षावर खर्चाचा भार पडतो, यामुळे त्यांना कर्जबाजारी व्हावे लागते. कमी खर्चातही लग्न करता येते, असा संदेश त्यांनी दिला आहे.

नवीन कुमार चंद्र आणि अंजना कुमारी यांनी बुधवारी दुपारी 12.30 वाजता लग्न केले. सब रजिस्ट्रार प्रथम रविंद्र मेहता यांच्या कार्यालयात त्यांनी कोर्ट मॅरेज केले. वाचविलेल्या पैशांतून हे आयएएस जोडपे गरीब कुटुंबासाठी काम करणार आहे.

टॅग्स :लग्नmarriage