RAW चा 'ब्लॅक टायगर' कसा बनला पाकिस्तानमध्ये मेजर...वाचा थरारक कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 03:59 PM2019-02-18T15:59:37+5:302019-02-18T16:03:10+5:30

भारतासाठी ज्याने आपला धर्म बदलला, देश सोडला आणि पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांपासून बचावासाठी खतनाही केला. शेवटी देशासाठी शहीदही झाला. ही कथा आहे पाकिस्तान लष्करात मेजर झालेल्या भारताच्या 'रॉ' एजंटची. रविंद्र कौशिक असे त्यांचे नाव होते.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना 'ब्लॅक टायगर' ची उपाधी दिली होती. खरेतर त्यांची कथाही तशीच चित्तथरारक होती. काळ होता 1975 चा. राजस्थानच्या गंगानगरमध्ये 23 वर्षांचा युवक नाट्यकला सादर करायचा. थिएटरधील त्याचे प्रेम आणि अभिनय रॉच्या अधिकाऱ्यांनी हेरला. यानंतर या युवकाला रॉच्या मोहिमेवर पाकिस्तानात पाठविण्यात आले. पाकिस्तानात रविंद्र हे नबी अहमद शाकिर या नावाने वावरू लागले. त्यांनी केवळ नावच नाही तर धर्म बदलला. याचबरोबर खतनाही करून घेतला. यासाठी त्यांना उर्दू आणि धर्मग्रंथांची शिकवण दिली गेली.

रविंद्र यांच्याबाबतचे भारतातील सर्व पुरावे नष्ट केले गेले. यानंतर त्यांनी कराची विद्यापीठामध्ये एलएलबीचे शिक्षण घेतले. यानंतर रविंद्र उर्फ नबी अहमद शाकिर हे पाकिस्तानी लष्करामध्ये भरती झाले आणि कमिशंड ऑफिसर बनले. पाकिस्तानी सेनेमध्ये पदोन्नती मिळवत मेजरही झाले. या काळात त्यांनी भारताला मोठ्या प्रमाणावर गुप्त माहिती पुरविली. काळाच्या ओघात त्यांना पाकिस्तानी मुलीशी लग्नही करावे लागले. अमानत आणि रविंद्र यांना एक अपत्यही झाले होते.

1979 ते 1983 या काळात त्यांनी भारताला महत्वाची माहिती पुरविली. त्याचा भारतीय सेनेला मोठा फायदा झाला. यामुळे भारतीय सैन्यामध्ये 'ब्लॅक टायगर' या नावाने ते ओळखले जाऊ लागले. ही उपाधी त्यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी दिली होती.

मात्र, पाकिस्तानात रॉचा आणखी एक गुप्तहेर पकडला गेल्याने या महान कलाकाराला भारताने गमावले होते. 1983 मध्ये इनायत मसीह याला रॉने पाकिस्तानात पाठविले होते. त्याला रविंद्र यांच्याशी संपर्क साधण्याचे काम दिले होते. मात्र, इनायतला पाकिस्तानी गुप्तहेरांनी ओळखले आणि रविंद्र यांची खरी ओळख उघड झाली होती.

पाकिस्तानी सेनेने रविंद्र यांना सियालकोटच्या तुरुंगात डांबले होते. तेथे त्यांना दोन वर्षे टॉर्चर केले जात होते. त्यानंतर मियावली जेलमध्ये आजार आणि छळ केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.