चेन्नईत पावसाचा कहर, जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 05:29 PM2017-11-03T17:29:45+5:302017-11-03T17:37:13+5:30

तामिळनाडूतील तटवर्ती परिसर तसेच राजधानी चेन्नईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

.मुसळधार पावसामुळे चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपासून या परिसरातील शाळा, महाविद्यालय बंद आहेत.

जागोजागी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून अनेक ठिकाणी वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. हवामान खात्याच्या माहितीनुसार, श्रीलंका आणि दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती.

गुरूवारी सलग पाच तासांहून अधिक वेळ पाऊस पडल्यानंतर चेन्नईतील तटवर्ती भागात भरती आल्याचे दिसून आले.

पाणी साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. शेकडो लोक रस्त्यावर अडकले होते. दक्षिण चेन्नईतील आयटी कॉरिडॉर परिसरात पाणी साचल्यामुळे अनेक रिक्षा बंद पडल्या होत्या.

मरिना बीचवरील रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले होते. यामुळे परिवहन मंडळाची वाहनेही रस्त्यावर उतरली नाहीत. त्यामुळे संध्याकाळी कार्यालयातून घरी परतणाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला.

गुरूवारी सकाळी साडेआठपासून शुक्रवारी मध्यरात्री दीडपर्यंत नंगमबक्कम परिसरात १५ सेमी पाऊस पडला.

चेन्नई पालिकेचे आयुक्त डॉ. डी. कार्तिकेयन यांनी, नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. पाऊस थांबल्यानंतर पाणी ओसरण्यास सुरूवात होईल, असे सांगितले आहे.