कामगारांचे कणखर नेते जॉर्ज फर्नांडिस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 10:46 AM2019-01-29T10:46:05+5:302019-01-29T12:31:08+5:30

कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना अल्झायमर नावाचा दुर्धर आजार झाल्याचे निदान झाले होते.

जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.

जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मात्र 1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. आणीबाणी उठल्यानंतर जॉर्ज यांनी तुरुंगात असतानाच बिहारमधील मुझफ्फरपूर येथून लोकसभेची निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्या काळात काँग्रेसला हरवून सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या काळात ते उद्योगमंत्री होते.

केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारमध्ये जॉर्ज यांच्या समता पक्षाचा समावेश होता. या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते. भाजपाशी जवळीक साधण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीकाही झाली. मात्र, ते डगमगले नाहीत. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी भारतीय जवानांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले होते.

जनता पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी स्वत:चे वेगळे पक्ष काढले. जॉर्ज यांनी समता पार्टीची स्थापना करून सक्रिय राजकारण सुरू केले. अर्थात, राजकारण करत असतानाही कामगारांशी असलेली नाळ त्यांनी कधी तोडली नाही.

कामगार नेताच नाही तर जॉर्ज फर्नांडिस एक उत्कृष्ट पत्रकारही होते. मार्क्सचा वारसा जपत कोकणी युवक , राइथावनी, द डॉकमॅन विकली सारख्या मासिकांचे संपादन त्यांनी केले.

जॉर्ज फर्नांडिस कामगारांसाठी ते अखेरपर्यंत लढत राहिले. त्यांचे राजकारण कधी कामगारहिताच्या आड आले नाही. कामगार संघटनांचे नेतृत्व करताना त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नेते घडले.