इंजिनिअर्स डे : सर्जनशील निर्मितीची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 06:10 PM2017-09-15T18:10:25+5:302017-09-15T18:23:16+5:30

भारतात 15 सप्टेंबर हा दिवस ‘अभियंता दिवस’ (इंजिनिअर्स डे) म्हणून साजरा केला जातो. भारतातील पहिले अभियंते सर मोक्षगुण्डम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्त भारतातील अभियांत्रिकीचे काही अद्भुत नमुने पाहुया

दिल्लीतील लोटस टेम्पल. भारतीय अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना म्हणून या धर्मनिरपेक्ष व कोणतीही मूर्ती नसलेल्या मंदिराकडे पाहिले जाते. 1986 मध्ये हे मंदिर बांधण्यात आले. या मंदिराची ख्याती जगभरात पसरलेली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पीर पंजाल रेल्वे बोगदा हा भारतामधील रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा आहे. 11 किलोमीटर लांबीचा हा बोगदा पूर्णपणे फायर आणि वॉटरप्रूफ आहे.

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक हा केबल स्टे ब्रीज आहे. ब्रिजच्या वजनाचं संपूर्ण टेन्शन केबल्सनं घेतलंय, म्हणून या ब्रिजला केबल स्टे ब्रिज म्हणतात. वांद्रे ते वरळी या प्रवासाला एरव्ही तीस ते चाळीस मिनिटं लागायची. पण या पुलामुळे हे अंतर फक्त 10 ते 15 मिनिटांत पार करता येते.

हुगळी नदीवर बांधण्यात आलेला प्रसिद्ध हावडा ब्रिज हा पश्चिम बंगालमधील हावडा आणि कोलकाता शहरांना जोडतो. हावडा ब्रिज रवींद्र ब्रिज या नावानं देखील ओळखला जातो.

कर्नाटकातील कृष्णराज सागर धरण KRS या नावानंही ओळखला जाते. स्वतः विश्वेश्वरय्या यांनी धरण बांधण्याच्या प्रस्तावापासून ते उद्घाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली.

खडतर भूप्रदेशामुळे कोकण रेल्वे हे अभियंत्यांपुढे एक मोठे आव्हानच होते. १९९८ मध्ये रेल्वे सुरु झाली ही रेल्वे कोकण किनारपट्टीला समांतर आहे आणि ७४१ किमीचे अंतर कापते. तब्बल २ हजार पूल आणि ९१ बोगदे या मार्गावर आहेत.