दिल्लीला तीन तासांत वादळाचा तडाखा बसणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 09:58 PM2018-05-08T21:58:12+5:302018-05-08T21:58:12+5:30

हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार सोमवारी संध्याकाळी धुळीचे वादळ चंदीगड, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये धडकले. त्यानंतर रात्री या वादळाचा तडाखा दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही बसला.

या वादळामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशात वेगाने वारे वाहत असून, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.

उत्तर भारतातील हवामानात कमालीचा बदल झाला आहे. दिल्लीत येत्या तीन तासांत अतिवृष्टी होणार असून वादळाचा तडाखाही बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राजस्थानात आणि हरयाणात याचा सर्वाधिक फटका बसला. दरम्यान, रात्री हे वादळ दिल्ली आणि उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले. या वादळामुळे वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसोबत मुसळधार पावसाचा तडाखाही उत्तर भारतात बसला. हवामान खात्याने यापूर्वीच १३ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांना वादळी पावसाचा अलर्ट जारी केला होता.

दिल्ली-एनसीआर परिसरात रात्री ११ पर्यंत ताशी ५० ते ६० प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहतील. त्याच सुमारास पावसालाही सुरुवात होईल. त्याशिवाय हिसार कँथल, जिंद आदी ठिकाणीही वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.