#BigBoss11 : जाणून घ्या बिग बॉस विजेती शिल्पा शिंदेचा गेल्या १८ वर्षातला प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 03:17 PM2018-01-15T15:17:34+5:302018-01-15T15:50:06+5:30

नुकताच बिग बॉस या शोच्या फायनलचा रंगतदार सोहळा पार पडला आणि त्यात शिल्पा शिंदे ही मराठमोळी अभिनेत्री विजयी ठरली. खरंतर शेवटच्या क्षणापर्यंत हिना खान आणि शिल्पा शिंदे एकमेकींना कडवी टक्कर देत होत्या.

शिल्पा शिंदे हिचे वडिल हायकोर्टात न्यायाधीश होते. ते आता हयात नाहीत पण तिने आपला विजय असा त्यांना समर्पित केला. तसंच कुटूंबाविषयी बोलायचं तर आणखी ३ भावंडं आहेत. ती स्वत: सायलॉजीची पदवीधर असून तिचा भाऊ बँकेत नोकरीला आहे तर एक बहिण मुंबईत तर दुसरी बहिण परदेशात स्थायिक आहे.

१९९९ पासून दूरदर्शन वाहिनीवरुन आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी शिल्पा आजवर अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसून आली. ‘भाभीजी घर पे है’ या मालिकेतील तिची ‘अंगुरी भाभी’ ही भूमिका विशेष गाजली. मात्र नंतर काही कारणास्तव वाद होऊन शिल्पाने ती मालिका सोडली.

४० वर्षीय शिल्पाच्या सर्व भावंडांची लग्न झाली असली तरी ती मात्र अविवाहीत आणि सिंगल आहे. रोमित राज या टीव्ही अभिनेत्र्याशी तिचं अफेअर असल्याच्या चर्चा इंडस्ट्रीत असल्या तरी त्यांनी अजूनही तसं काही जाहीर केलेलं नाही आहे.

हातिम, चिडीया घर, देवों के देव महादेव, लापतागंज या मालिकेत तिने केलेलं काम पाहताना ती महाराष्ट्रीय मुलगी असल्याचं आपण विसरुन जातो. तिने एका चित्रपटातही काम केलं होतं मात्र तो रिलीज झाला नाही. इतकंच नाही तर तिने काही दाक्षिणात्य चित्रपटांतही काम केलं आहे.

तिच्या या क्षेत्रात येण्याला तिच्या वडिलांचा विरोध होता मात्र तिला वकील होण्यात काहीच रस नव्हता. मध्यंतरी तिने अपयशाने हार मानून इंडस्ट्री सोडायचा विचार केला होता, मात्र त्यानंतर तिला ‘अंगुरी भाभी’ने पुन्हा नव्या दिशा दाखवल्या आणि ती आपल्या फॉर्ममध्ये परतली.

तिला अभिनयाव्यतिरिक्त डान्स आणि पेंटींगची आवड आहे. तिच्या घरातलं कोपरे तिने आपल्या हाताने सजवले आहेत. तणावातून बाहेर येण्यासाठी आणि मनाच्या समाधानासाठी ती कायम चित्रकलेची मदत घेते. तसंच पदवीव्यतिरिक्त तिने इंटेरिअर डेकोरेशनचा कोर्सही पुर्ण केला आहे.