राज ठाकरेंच्या खास शैलीत अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2017 03:06 PM2017-10-11T15:06:19+5:302017-10-11T15:10:04+5:30

महानायक अमिताभ बच्चन यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबूकच्या माध्यमातून खास आपल्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांची कलाकिर्द उलगडली आहे.

राज ठाकरे यांनी सविस्तर पोस्ट लिहित अमिताभ बच्चन यांच्याबद्दल दिलखुलास मत मांडलं. 'शतकातला श्रेष्ठ कलावंत हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे. १९७०च्या दशकात ते हिंदी सिनेमात आले आणि रुपेरी पडद्यानं कात टाकली. अभिनय, कथावस्तू, संगीत या सगळ्याच गोष्टी बदलल्या'' असं राज ठाकरेंनी लिहिलं आहे

राज ठाकरे यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेल्या वादावरही भाष्य केलं. 'काही वर्षांपूर्वी माझा अमिताभ बच्चन यांच्याशी वाद झाला. त्याचं स्पष्टीकरण मी दिलंय. माझी भूमिका मराठी भाषेच्या संदर्भात होती. आजसुद्धा ती कायम आहे. त्यांच्या समक्ष मी ती मांडली आहे हेही आवर्जून सांगतो.'

'एक गोष्ट सांगितली पाहिजे की लता दीदी, अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर ही लोकोत्तर माणसं एका राज्यापुरती मर्यादित नाहीत. ती साऱ्या भारताची आहेत', अशी भावना राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

मतभेद असले तरीही अमिताभ यांच्या वैभवशाली कलाकिर्दीबद्दल, श्रेष्ठत्वाबद्दल माझ्या मनात शंका नव्हती, आजही नाही. अमिताभ बच्चन हे सिनेमा संस्कृतीचे राजदूत आहेत यावरून वाद होऊ शकत नाही असं सांगायला राज ठाकरे विसरले नाहीत.