स्वच्छतेचा संदेश देण्याची आयडिया भारी; टॉयलेट कॅफेची बातच न्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:00 PM2019-02-06T16:00:42+5:302019-02-06T16:29:07+5:30

जगभरात वेगवेगळ्या पद्धतीचे कॉफी कॅफे पाहायला मिळतात. साधारण कॅफे आणि टॉयलेट या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मात्र प्रयागराजमध्ये टॉयलेट सीटवर बसून कॉफीचा आनंद आता घेता येत आहे. या अनोख्या कॅफेबाबत जाणून घेऊया.

प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं असून देश-विदेशातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. कुंभमेळ्यातील परमार्थ निकेतन कॅम्पमध्ये टॉयलेट कॅफे तयार करण्यात आला आहे.

ओपन एअर टॉयलेट कॅफेमध्ये सीट्ससोबतच काचेचं आकर्षक डायनिंग टेबल ठेवण्यात आले आहे. तसेच कॉफी कॅफेमधील या आगळ्या वेगळ्या सीटचा उपयोग खुर्ची म्हणून करण्यात येत आहे.

टॉयलेट कॅफेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या टॉयलेट सीट असून त्यावर ग्राहकांना बसण्यासाठी काच लावण्यात आली आहे. कॅफेची ही हटके स्टाईल कुंभमेळ्यातील लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा विचार केला असता ही संकल्पना सुचल्याची माहिती कॅफेच्या निर्मात्यांनी दिली आहे. तसेच लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देवून त्याबाबत टॉयलेट कॅफेच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करत असल्याचं ही त्यांनी सांगितलं.

प्रयागराजमधील या अनोख्या टॉयलेट कॅफेमधून घरामध्ये टॉयलेट बांधण्याचे तसेच स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. या टॉयलेट कॅफेमध्ये सेल्फी आणि ग्रुप फोटो काढण्याचा आनंद घेता येतो.

टॉयलेट कॅफेच्या माध्यमातून ज्याप्रमाणे आपण आपलं घर, किचन स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे टॉयलेट ही स्वच्छ ठेवण्याचा मोलाचा संदेश दिला जात आहे. लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करणे हाच कॅफेचा उद्देश असल्याने या टॉयलेट कॅफेमध्ये येणाऱ्या सर्व लोकांना मोफत कॉफी आणि स्नॅक्स देण्यात येत आहे.