पावसाळ्यात घरातील लाकडी फर्निचरची अशी घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2018 04:31 PM2018-07-28T16:31:42+5:302018-08-01T18:10:49+5:30

घामानं हैराण करणाऱ्या उन्हाळ्यानंतर आपण आपसूकच पावसाची वाट पाहू लागतो. पण हाच पावसाळा आरोग्याच्या आणि घरातील फर्निचरसंबंधित अनेक समस्या सोबत घेऊन येतो. अशातच घरातील फर्निचर लाकडाचे असेल तर खास काळजी घेणं गरजेचं असतं. पावसाळ्यात लाकडाच्या फर्निचरची काळजी घेणं म्हणजे फार किचकट काम असतं. तज्ज्ञांच्या मते, लाकडाच्या फर्निचरच्या कानाकोपरा तसेच त्याच्या खालचा आणि मागील भाग महिन्यातून एकदा तरी स्वच्छ करणं गरजेचं असतं. जाणून घेऊयात पावसाळ्यात फर्निचरची काळजी घेण्यासाठी काही टीप्स

पावसाळ्यात घरातील लाकडी फर्निचर जास्तीत जास्त मोकळ्या हवेमध्ये ठेवावं.

जास्त गरम वस्तू सरळ लाकडी फर्निचरवर ठेवू नका.

काही कालावधीनं फर्निचरची जागा बदला.

घरातील लाकडी सोफ्यावर ओल्या उशा ठेवू नका.

पावसाळा सुरू होण्याआधीच फर्निचरवर वॅक्स (मेण) किंवा वॉर्निशचा लेप लावावा. त्यामुळे फर्निचरवर एक प्रोटेक्टिव्ह लेअर राहते. त्यामुळे पावसाळ्यात फर्निचरचा ओलाव्यापासून बचाव होतो.

फर्निचर भिंतींना टेकून अथवा चिकटवून ठेवू नका. त्यामुळे भिंतींमधील ओलाव्याचा परिणाम फर्निचरवर होणार नाही.

पावसाळ्यात लाकडाच्या दरवाजे आणि खिडक्या ओलाव्यामुळे फुगतात. असे होऊ नये म्हणून त्यांना तेल लावावे.