इथे गोंगाट केला तरी चालेल; लहान मुलांसाठी अनोखी लायब्ररी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 01:47 PM2019-05-15T13:47:16+5:302019-05-15T14:04:11+5:30

लायब्ररी म्हटलं की शांतता आणि नियम आठवतात. मात्र जर कोणी शांतता नसलेली लायब्ररी आहे असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. जकार्तामध्ये लहान मुलांसाठी अशीच एक अनोखी लायब्ररी आहे.

जकार्ता शहरातून बाहेर निघाल्यानंतर एका फ्लायओव्हरच्या खाली दोन रस्त्यांच्या मधोमध चिमुकल्यांसाठी ही लायब्ररी तयार करण्यात आली आहे. रस्त्यांच्या मधोमध ही लायब्ररी असल्याने येथे शांततेचा नियम लागू नाही.

'तमान बाका मासयाराकट कोलांग' असं या लायब्ररीचं नाव असून तिच्या अनोख्या स्थानावरून ती लोकप्रिय झाली आहे. लहान मुलांना पुस्तकं वाचायला मिळावी यासाठी ही लायब्ररी तयार करण्यात आली आहे.

लहान मुलांना पुस्तकांच्या अधिक जवळ आणण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ही लायब्ररी असल्याची माहिती लायब्ररीची कोऑर्डिनेटर देविना फैब्रियांती यांनी दिली आहे.

लायब्ररी सुरू होण्याआधी त्या ठिकाणचा परिसर अस्वच्छ होता. मात्र काही स्थानिक संघटनांनी एकत्र येऊन त्या परिसराची स्वच्छता केली. तसेच सुंदर चित्रे रेखाटण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी लायब्ररी तयार करण्यात आली.

शाळेतून आल्यानंतर जवळपास 70 हून अधिक मुलं या लायब्ररीमध्ये येऊन खेळण्याचा आनंद लूटतात. तसेच येथील शिक्षक मुलांना गोष्टी सांगतात. त्याचा गृहपाठ घेऊन अभ्यासात मदत करतात.

लायब्ररीमध्ये गोष्टींची पुस्तकं ही अधिक आहेत. त्यामुळे छान छान गोष्टी वाचण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी अनेक विद्यार्थी येथे येत असतात. मुलांना या लायब्ररीमध्ये अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.