जाणून द्या, जगभरातील प्रसिद्ध फेस्टिव्हल!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 03:22 PM2018-10-17T15:22:49+5:302018-10-17T15:32:49+5:30

दक्षिण कोरियात बोरीयोंग मड फेस्टिव्हल साजरा करण्यात येतो. हा उत्सव पारंपरिक सण नाही. एका कोरियन सौंदर्य प्रसाधनाच्या कंपनीने सुरू केलेला उत्सव आहे. ही कंपनी मड म्हणजेच मऊसर मातीच्या चिखलाचा वापर करून सौंदर्य प्रसाधने बनवते. या कंपनीने कुठलीही जाहिरातबाजी न करता आपल्या ग्राहकांसाठी सुरू केलेला हा उत्सव आहे.

ब्राझीलमधील कार्निव्हल जगभरात प्रसिद्ध आहे. 1823 पासून सुरू झालेला हा उत्सव आहे. यामध्ये त्यामध्ये सांबा नृत्य आणि संगीत याचा आस्वाद घेण्यासाठी बरेच पर्यटक ब्राझीलला भेट देतात. या ठिकणी एक परेड निघते, यामध्ये रंगीबेरंगी पोशाख परिधान करुन महिला आणि पुरुष नृत्य करतात.

स्पेनमध्ये 1945 सालापासून सुरु करण्यात आलेला 'ला टोमॅटिना' हा उत्सव खूप प्रसिद्ध आहे. टोमॅटो एकमेकांना मारून टोमॅटोच्या रसात न्हाऊन निघणे म्हणजे 'ला टोमॅटिना'. पाण्याचे फवारे, टोमॅटोचा चिखल आणि ट्रकभर टोमॅटो मध्ये उड्या मारून त्याचा रस काढून एकमेकांना तो रस लावणे अशा पद्धतीचा हा उत्सव आहे.

जर्मनीमध्ये ऑक्टोबर फेस्ट साजरा करण्यात येतो. येथील म्युनिकमध्ये बिअरचे सेवन करण्यासाठी हा फेस्ट साजरा केला जातो. 16 दिवस सर्वत्र बिअर विक्री आणि खरेदी केली जाते. जगभरातून लोक या फेस्टच्यानिमित्त जर्मनीत येतात.

थायलंडमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सॉंगक्रान वॉटर फेस्टिव्हल साजरा केला जातो. या सणाला रंगांची उधळण केली जाते. जागो जागी हत्ती सोंडेच्या साहाय्याने लोकांवर पाण्याचे फवारे मारतात. तसेच, रात्री फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्षाची शुभ सुरुवात थायलंडवासी करतात.

तैवानच्या पिंगस्कीमध्ये पिंगस्की लँटर्न फेस्टिव्हल साजरा करण्यात येतो. फेस्टिव्हलमध्ये आकाशात कागदी कंदील सोडले जातात.

मेक्सिकोमध्ये 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर असा तीन दिवस चालणारा डे ऑफ डेड हा फेस्टिव्हल साजरा करण्यात येतो. हा सण भारतात होणाऱ्या पितृ पंधरवड्या प्रमाणेच असतो. या तीन दिवसात पूर्वजांना श्रद्धांजली वाहिली जाते.

भारतात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात होलिकेचे दहन आणि रंगांची उधळण हे दोन महत्वाचे कार्यक्रम असतात.