अशी रेस्टॉरंट्स कधी पाहिली आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2018 03:53 PM2018-04-16T15:53:13+5:302018-04-16T15:53:13+5:30

जगात काही ठिकाणी जगावेगळी रेस्टॉरंट्स आहेत. हटके कल्पनांमुळे या रेस्टॉरंट्सची कीर्ती सर्वदूर पसरली आहे.

फिलिपिन्समधलं धबधब्याशेजारचं रेस्टॉरंट: निसर्गाच्या सानिध्यात आपल्या आवडत्या पदार्थाची लज्जत चाखण्याची मजाच काही और असते. फिलिपिन्समधल्या एका वॉटरफॉल रेस्टॉरंटमध्ये हा आनंद लुटता येतो. त्यामुळेच लॅबसिन वॉटरफॉल रेस्टॉरंटमध्ये कायम देश-विदेशातील पर्यटकांची मोठी गर्दी असते.

बर्ड नेस्ट रेस्टॉरंट: पक्षांची घरटी, त्यांना मिळणारा निसर्गाचा सहवास कधीकधी आपल्याला हवाहवासा वाटतो. मात्र आपण थोडीच घरटं बांधून निसर्गाचं सानिध्य पक्षांसारखं अनुभवू शकणार? मात्र थायलंडमधल्या एका हॉटेलमध्ये हा सुंदर अनुभव घेता येतो.

मालदीवमधलं अंडरवॉटर रेस्टॉरंट: समुद्राकाठी बसणं, लाटांचा आवाज कानात साठवणं सगळ्यांनाच आवडतं. समुद्राच्या पोटात जावं, अथांग समुद्राचा वेध घ्यावा, असं अनेकांना वाटतं. याच समुद्राच्या पोटात छान जेवण घेण्याची कल्पनाच अत्यंत सुंदर वाटते. मालदीवमधल्या अंडरवॉटर रेस्टॉरंटमध्ये हा अविस्मरणीय अनुभव घेता येतो.

कॅट कॅफे, जपान: धकाधकीच्या जीवनात घरी प्राणी पाळणं तसं अवघडच. अनेकांना मांजरी आवडतात. मात्र त्यांना घरी ठेवणं काहींना शक्य नसतं. अशांसाठी जपानमध्ये कॅट कॅफे आहे. याठिकाणी खूप मांजरी आहेत. या मांजरींशी खेळण्याचा आनंद तुम्हाला इथं घेता येईल.

आईस रेस्टॉरंट, दुबई: दुबई म्हटलं की बुर्ज खलिफा, डेझर्ट सफारीची आठवण होते. वाळवंटात वसलेलं हे शहर नितांत सुंदर आहे. मात्र याच वाळवंटात थंडीनं गारठवून टाकणारीही एक जागा आहे. ही जागा म्हणजे आईस रेस्टॉरंट. या रेस्टॉरंटमधल्या सर्व वस्तू बर्फापासून बनलेल्या आहेत. दुबईच्या उष्णतेला कंटाळलेल्या अनेकांची पावलं याठिकाणी वळतात.