ट्विंकल खन्नाची 'सीधी बात'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 11:59 AM2018-04-04T11:59:42+5:302018-04-04T12:00:45+5:30

अभिनेता अक्षय कुमारने आपल्या फेसबुक अकाऊंटवर नुकताच ट्विंकल खन्नाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडीओत ट्विंकलने अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

या व्हिडीओत ट्विंकलने जिमला जाणाऱ्यांना काही टिप्स दिल्या आहेत. तुम्हाला झीरो फिगर हवी असेल तर लो-प्रोटिन डाएट असलेले पदार्थ खावेत, असे ट्विंकलने सांगितले.

या व्हिडीओत ट्विंकलने आपला मुलगा आरव याच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी ट्विंकलने एक आठवण सांगितली. माझा मुलगा १९९६ सालच्या माझ्या जान चित्रपटातील एक क्लिप सारखी सारखी पाहायचा. ट्विंकल सहअभिनेत्याच्या छातीचे चुंबन घेत असल्याचा तो सीन होता. आरव तोच सीन सारखा सारखा पाहत रहायचा. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा आरवने त्या सर्व सीन्सचे एकत्र कोलाज ट्विंकलला तिच्या बर्थ डे ला पाठवले. त्यामुळे ट्विंकलची चांगलीच पंचाईत झाली होती, असे ट्विंकलने म्हटले.

याशिवाय, भारतात महिलांना मिळणाऱ्या असमान वागणुकीचा मुद्दाही तिने उपस्थित केला. आपल्याकडे महिला नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात. मात्र, जगातील 147 देशांतील पुरूष त्यांच्या पत्नीने उपवास न करताही भारतातील पुरूषांपेक्षा जास्त जगतात. त्यामुळे असे उपवास करून कोणताही फायदा होत नाही, असे ट्विंकलने म्हटले आहे.

पुरूषांच्या पोटात 7 मिमीचा किडनी स्टोन झाला तर त्यांना त्रास होतो. परंतु, महिला नऊ महिने बाळाचे वजन पोटात घेऊन वावरतात. परंतु, अनेकदा स्त्रियांना दोष दिला जातो, याकडे ट्विंकलने लक्ष वेधले.