अहो...काय सांगता? 'ही' तर जिवंत भूतंच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2019 05:10 PM2019-01-01T17:10:01+5:302019-01-01T17:17:38+5:30

आपण अनेकदा भूत ही संकल्पना ऐकतो. पण खरं की खोटं यामध्ये स्वत:च गुरफटतो. खरं तर अंधश्रद्धेचा भाग असलेली ही संकल्पना एखाद्याला घाबरवण्यासाठी सर्रास वापरली जाते. पश्चिम आफ्रिकेमध्ये असणारं एक छोटसं गाव म्हणजे बेनिन. आफ्रिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रस्त असलेली काळी जादू वूडूची सुरूवातही याच गावातून झाली होती. याच बेनिन गावामध्ये 'इगुनगुन' नावाच्या दुर्मिळ जमातीचे लोक राहतात. त्यांना 'जिवंत भूत' असंही म्हणतात.

बेनिन गावामध्ये या जमातीबाबत अशी मान्यता आहे की, इगुनगुन एखाद्या सामान्य व्यक्तीच्या संपर्कात आले किंवा त्यांना स्पर्श झाला तर तत्काळ त्या व्यक्तीचा मृत्यू होतोच पण इगुनगुनही मरण पावतो.

इगुनगुन एका पारंपारिक पोषाखाव्यतिरिक्त इतर अन्य रंगिबेरंगी कपडेदेखील परिधान करतात. त्यांच्या पारंपारिक पोषाखाला 'लबादा' असं म्हटलं जातं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इगुनगुन आपला चेहरा कोणालाच दाखवत नाहीत. यामागील सर्वात मुख्य हेतू स्वतःची ओळख लपवणं असा असतो.

इगुनगुनचा मुख्य काम म्हणजे, गावातील लोकांची आपापसातील भांडणं मिटवून त्यावर उपाय सुचवणं. असं मानलं जातं की, यांच्या अंगात मृत पावलेले पुर्वज येतात आणि तेच एखाद्या प्रकरणात आपला निर्णय देतात. त्यामुळे इगुनगुनने दिलेला निर्णय हा साक्षात देवाचाच निर्णय समजला जातो.

गावामध्ये एखादं भांडण झाल्यास किंवा एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास एकापेक्षा जास्त इगुनगुन एखादी पंचायत बसवल्याप्रमाणे एकत्र बसतात. हे सगळेजण मोठ्या आवाजात काहीशा विचित्र भाषेमध्ये किंवा अस्पष्ट शब्दांमध्ये बोलतात.

इगुनगुनसोबत काही माइंडर म्हणजेच, त्यांचं म्हणणं लोकांना समजावून सांगणारे असतात. हे माइंडर इगुनगुन जमातीचेच लोक असतात. त्यांच्या हातामध्ये एक छडी असते. इगुनगुनला स्पर्श केल्यामुळे मृत्यू होतो, अशी येथील मान्यता असल्यामुळे हे माइंडर त्यांच्यापासून काही अतंर लांब राहतात. हे माइंडर इगुनगुनसोबतच असतात. ज्यावेळी इगुनगुन एखाद्या ठिकाणी बसून आराम करत असतील त्यावेळी हे माइंडर पहारा देण्याचं काम करत असतात.

इगुनगुनसोबत ढोल आणि नगाडे वाजवणारी लोकंही असतात. इगुनगुन ढोल आणि नगाड्यांच्या ठेक्यावर नृत्यही करतात. इगुनगुन कधीच आपली खरी ओळख सांगत नाहीत. इगुनगुनच्या स्पर्शाने मृत्यू होण्याची भिती लोकांच्या मनात खोलवर रूजली आहे. त्यामुळे चुकूनही थोडासा जरी स्पर्श झाला तर लोकं प्रचंड तणावाखाली येतात.