त्यांच्यासोबत नावं जोडली गेल्यानंतर आता दीपिका करेल 'या' अभिनेत्याशी साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2018 06:07 PM2018-01-04T18:07:38+5:302018-01-04T18:39:04+5:30

उद्या म्हणजेच ५ जानेवारीला बॉलिवूडची डिंपल गर्ल ३१वा वाढदिवस साजरा करतेय. तिचं सौंदर्य आणि फिटनेस पाहता तिच्या वयाचा आकडा खोटा वाटतो. माध्यमांत सुरु असलेल्या चर्चा खऱ्या असतील तर ती उद्याच्या खास दिवशी बॉयफ्रेंड रणवीर सिंगसोबत साखरपुडा करणार आहे. हे सर्वांचीच आवडती जोडी असल्याने या बातम्या ऐकून त्यांचे चाहते फार खुश आहेत. खरंतर बॉलिवूडमध्ये पाऊल टाकल्यापासूनच तिचं नाव सतत कोणा ना कोणासोबत जोडलं गेलं. पाहुयात कोणासोबत अफेअर असल्याच्या चर्चांना पुर्णविराम देत आता दीपिका आणि रणवीर साखरपुडा करीत आहेत.

शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दीपिकाचं सतत अनेकांसोबत नाव जोडलं गेलं त्यापैकी एक म्हणजे युवराज सिंग. क्रिकेट आणि बॉलिवूडमध्ये कायम अशी नाती जोडली गेली आहेत. युवराज सिंग आणि दीपिका पदुकोन यांना अनेकदा कॅमेऱ्याने एकत्र टिपलं होतं. एका बर्थ डे पार्टीमध्ये त्यांच्या एकत्र येण्याने तर वृत्तपत्रांची पानंच्या पानं भरली होती. यांच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगली. मात्र दोघांनी कधीच ते जाहीरपणे कबुल केलं नाही. तसंच महेंद्रसिंग धोनीसोबतही तिचं नाव अनेकदा जोडलं गेलं. एका फॅशन शोला हे दोघं एकदा रॅम्पवर एकत्र दिसले होते.

विजय मल्ल्या यांचा मुलगा सिध्दार्थ मल्ल्या याच्यासोबत दीपिका कायम अनेक पार्टीज आणि अॅवॉर्ड शोमध्ये दिसून यायची. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या आयपीएल संघाचा सहमालक असलेल्या सिध्दार्थसोबत मॅच पाहायला ती स्टेडीयममध्येही यायची. मॅचमधल्या एका आनंदाच्या क्षणी ‘भावना’ अनावर होऊन सिध्दार्थ दीपिकाला किस करतानाचा फोटोही चांगलाच गाजला होता. तरीही त्यांनी ‘आम्ही फक्त चांगले मित्र आहोत’, असं म्हणणं कायम ठेवलं. नंतर त्यांच्या नावाच्या चर्चाही कमी होत गेल्या.

रणबीर कपूर आणि दीपिका तर आकंठ एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते. तिने आपल्या मानेवर आर.के. असा टॅटूही काढून घेतला होता. मात्र या रिलेशनशिपचा शेवट फार वाईट झाला. या ब्रेकअपमुळे तर दीपिका मानसिक तणावाखाली गेली होती, ज्यातून बाहेर पडणं तिला फार कठीण गेलं. त्यांच्या फॅन्सनाही फार मोठा धक्का बसला होता. कतरिना कैफसोबत होत असलेली रणबीर कपुरची जवळीक या नात्याला संपवत असल्याची चर्चा लोकांमध्ये होती. मात्र तरीही त्यांनी आपलं व्यावसायिक नातं कायम ठेवलं.

या सगळ्यातून बाहेर येऊन तिने पुन्हा आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केलं आणि आज ती बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे. बॉलिवूडचा मोस्ट एनर्जेटीक अॅक्टर रणवीर सिंगसोबतच्या तिच्या रिलेशनशिपच्या चर्चा कधीच थांबल्या नाहीत. आता ते बॉलिवूडमधलं सर्वात लव्ह्ड कपल आहे. त्या दोघांनी आपलं नातं कधी जाहीरपणे शब्दातून कबुल केलं नसलं तरी त्यांच्या हावभावांतून आणि एकमेकांसोबत वावरण्यातून ते कधीच लपलंही नाही. मध्यंतरी त्यांच्याही नात्यांत वाईट काळ येऊन गेला मात्र त्यातही कायम त्या दोघांनी एकमेकांना साथ दिली. रणवीर तर कायम तिच्याप्रति असलेल्या आपल्या भावना जाहीरपणे कबुल करत आला आहे. आशा ठेवुया की उद्या या दोघांचा साखरपुडा होवो आणि दोघांना कोणाची नजर न लागो.