सोमालियाची राजधानी मोगादिशूत भीषण बॉम्बस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 04:22 PM2017-10-16T16:22:34+5:302017-10-16T16:24:57+5:30

सोमालियाची राजधानी मोगादिशू शनिवारी सर्वात शक्तीशाली स्फोटाने हादरली. शनिवारी एका हॉटेल आणि बाजाराच्या बाहेर झालेल्या स्फोटात 276 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 300 लोक जखमी झाली आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो.

गेल्या तीन दशकातील हा सर्वात शक्तीशाली स्फोट असल्याचं बोललं जातं आहे. हा स्फोट इतका भीषण होता की घटनास्थळापासून 100 ते 150 मीटरच्या परिघात उपस्थित असलेले नागरिकही मृत्युमुखी पडले.

सोमालियाच्या परराष्ट्र मंत्रालयाला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणावर बॉम्बसाठा ठेवून तो एका गजबजलेल्या रस्त्यावर सोडण्यात आला. सोमालियातील अल शबाब नावाच्या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवून आणल्याची माहिती आहे.

सोमालियाचे नेते अब्दीरहमान उस्मान यांनी या घटनेला अतिभयंकर असं म्हंटलं आहे. तुर्की आणि केनियासह अनेक देशातून जखमींवर उपचारासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. परराष्ट्र मंत्रालयासह महत्त्वपूर्ण मंत्रालयाच्या जवळील रस्त्यांवर निशाणा साधत हा ट्रक बॉम्बस्फोट झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली होती.

सोमालियाचे राष्ट्रपती मोहम्मद अब्दुल्लाही मोहम्मद यांनी तीन दिवसाच्या दुखवट्याची घोषणा केली आहे. तसंच रक्तदान करून पीडितांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. शहरात झालेल्या या स्फोटामुळे इमारतीच्या खाली दबलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.

सोमालियात झालेल्या या भीषण हल्ल्याची अजून कुठल्याही संघटनेनं जबाबदारी स्विकारली नाही. पण अल-शबाब या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असावा असे संकेत मिळत आहेत. अल-शबाब या संघटनेचा अल-कायदाशी संबंध आहे.