या आहेत चंद्राबाबत तुम्हाला माहीत नसलेल्या काही गमतीदार गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 02:39 PM2019-07-23T14:39:53+5:302019-07-23T14:58:18+5:30

भारताचे चांद्रयान-2 सोमवारी दुपारी चंद्राच्या दिशेने यशस्वीरीत्या झेपावल्याने चंद्राबाबत सर्वांच्या मनात पुन्हा एकदा कुतुहल निर्माण झाले आहे. पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्राबाबत अजूनही अनेक गोष्टी अज्ञात आहेत. आज जाणून घेऊया चंद्राबाबतच्या अशाच काही रंजक गोष्टी

चंद्रावरील तापमान हळुहळू कमी होत आहे. त्यामुळे चंद्राचा पृष्टभाग आकुंचन पावत असल्याचे नासाच्या संशोधनामधून समोर आले आहे. गेल्या लाखो वर्षांत चंद्राचा पृष्टभाग सुमारे 50 मीटरनी आकुंचन पावला आहे.

20 जुलै 1969 रोजी अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्डिन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. मात्र त्याबाबत नेहमीच शंका घेतली जाते. तसेच चंद्रावर वातावरण नसताना तिथे झेंडा फडकलाच कसा असा प्रश्नही उपस्थित केला जातो.

चंद्रावरील तापमानामध्ये कमालीची तफावत आढळते. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा चंद्रावरील तापमान 127 अंशापर्यंत पोहोचते. तसेच सूर्यास्ताच्यानंतर येथील तापमान -153 अंशापर्यंत कमी होते.

चंद्रावर वसाहत करण्याचे स्वप्न मानव अनेक वर्षांपासून पाहत आहे. चंद्राच्या पृष्टभागावर कधीकधी मानवी चेहरे दिसल्याचे सांगितले जाते. मात्र चंद्राच्या पृष्टभारावरील खडबडीतपणामुळे अशा आकृती दिसतात.

अंतराळातील हालचालींमुळे चंद्र पृथ्वीपासून दूर जात आहे. त्यामुळे 55 कोटी वर्षांनंतर एकवेळ अशी येईल जेव्हा चंद्र आपल्यापासून खूप दूर गेलेला असेल. त्यामुळे पृथ्वीवर संपूर्ण सूर्यग्रहण दिसू शकणार नाही.

रात्रीच्या वेळी चंद्राला पाहिल्यानंतर लांडगे मोठ्याने ओरडतात, असे सांगितले जाते. मात्र त्यात काहीही तथ्य नाही.

आतापर्यंत 12 जण चंद्रावर जाऊन आले आहेत. त्यापैकी सर्वजण अमेरिकन आहेत. तसेच एकही महिला आतापर्यंत चंद्रावर गेलेली नाही.