मलेशियामध्ये असा दणक्यात साजरा झाला गणेशोत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 02:48 PM2018-10-05T14:48:53+5:302018-10-05T16:06:23+5:30

मलेशियाच्या महाराष्ट्र मंडळातर्फे गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही मंडळातर्फे गणपतीची आगमन मिरवणूक, आरती, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहभोजन आणि विसर्जन मिरवणूक अशी गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती.

ढोल ताशाच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर वाजत गाजत गणरायाचं आगमन झाले. मंडळाचे उपाध्यक्ष आशुतोष देशपांडे यांनी गणपतीची पूजा केली.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तीनशेच्या आसपास मराठी बंधूभगिनींनी गणेशाची अतिशय उत्साहात आणि भक्तिभावाने आरती केली आणि दर्शन घेतले.

भारतीय दूतावास राजीव आहुजा आणि नितीशकुमार उज्ज्वल आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्थानिक मराठी कलाकारांनी जमलेल्या श्रोत्यांचे मनोरंजन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मंडळाचे उपाध्यक्ष आशुतोष देशपांडे, संदेश सावर्डेकर (सचिव), प्रसाद नाडकर्णी (खजिनदार) आणि सौ. शिल्पा टंकसाळे (महिला प्रतिनिधी) यांनी सर्वांचे आभार मानले.

स्नेहभोजनानंतर गणरायाची वाजत गाजत मिरवणूक काढून गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. परदेशात असूनही बाप्पाच्या सोहळ्याचं असा अनुभव दिल्याबद्दल जमलेल्या श्रोत्यांनी मंडळाचे आभार मानले.

मलेशियाच्या महाराष्ट्र मंडळाचे सर्व कार्यकारी सभासद आणि गिरीश सहस्रबुद्धे, नितीन घाडगे, रेश्मा कामत ,हर्षल भावसार आणि मुक्ता गोसावी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात खूप परिश्रम घेतले.