कंपनी असावी तर अशी; 'या' कंपन्यांच्या सुविधा पाहून थक्क व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 07:23 PM2018-06-06T19:23:27+5:302018-06-06T19:23:27+5:30

कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीत कंपनीकडून देण्यात आलेल्या सोयी सुविधांचा मोठा वाटा असतो. कंपनीनं चांगल्या सुविधा दिल्यावर कर्मचाऱ्यांचाही हुरुप वाढतो. कर्मचाऱ्यांना उत्तम सोयी देणाऱ्या कंपन्यांमध्ये नेटफ्लिक्सचा क्रमांक वरचा लागतो. पालक होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेटफ्लिक्स वर्षभरासाठी सुट्टी देते. विशेष म्हणजे ही सुट्टी भरपगारी असते. याशिवाय कंपनीत पुन्हा रुजू झाल्यावर कर्मचाऱ्यांना हाफ डे आणि फुल डे असे दोन पर्याय उपलब्ध असतात.

एअरबीएनबी: अनेक कंपन्यांमधील मॅनेजर्स सुट्टीसाठी अर्ज केला की नाक मुरडतात. मात्र एअरबीएनबी ही कंपनी दरवर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना फिरण्यासाठी 2 हजार डॉलर देते.

गुगल: जगभरात प्रख्यात असणारी ही कंपनी कर्मचाऱ्यांना मोफत जेवण देते. याशिवाय कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या साथीदाराला 10 वर्ष निम्मा पगार देते.

फेसबुक: डेटा चोरी प्रकरणामुळे वादात सापडलेली सोशल मीडिया क्षेत्रातील ही कंपनी कर्मचाऱ्यांना उत्तम सेवा देण्यात मागे नाही. फेसबुकच्या मेनलो पार्कमधील कर्मचाऱ्यांना वॅले पार्किंगची सुविधा मिळते. याशिवाय इलेक्ट्रिक कार्ससाठी मोफत चार्जिंगची सोयही उपलब्ध आहे. याशिवाय नव्यानं आई-वडिल झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना 4 हजार डॉलर दिले जातात.

टेस्ला: कंपनीच्या कारपूल कार्यक्रमानुसार कर्मचाऱ्यांना कंपनीची कार घरी नेता येते. याशिवाय कर्मचारी विकेंडला कार स्वत:जवळ ठेऊ शकतात.