चंद्रावर वसले होते एलियन्सचे शहर, नासाच्या छायाचित्रांमधून झाला उगलडा?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 11:06 AM2019-07-21T11:06:28+5:302019-07-21T11:25:28+5:30

20 जुलै 1969 रोजी मानवाने प्रथमच चंद्रावर पाऊल ठेवले होते. या घटनेचा सुवर्णमहोत्सव यावर्षी नासासह संपूर्ण मोठ्या उत्साहाने साजरा केला. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाच्या अपोलो-11 या यानामधून नील आर्मस्ट्राँग, मायकेल कॉलिन्स आणि एडविन एल्ड्रिन हे चंद्रावर जाणारे पहिले मानव ठरले होते. दरम्यान, या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नासाने मोठा गौप्यस्फोट केला आहे. चंद्रावर एलियन्स अर्थात परग्रहवासीयांनी वसवलेले एक प्राचीन शहर होते, असा दावा करण्यात आला आहे.

नासाने काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यापैकी काही छायाचित्रे ही चंद्राच्या अंधाऱ्या भागातील आहेत. या छायाचित्रांमुळे चंद्रावर एलियनचे प्राचीन शहर वसले होते, या शक्यतेला बळ मिळाले आहे.

मिररने दिलेल्या एका वृत्तानुसार नासाने प्रसिद्ध केलेल्या काही छायाचित्रांमध्ये दिसणारी चौकोनी आकाराची खडके म्हणजे त्या पुरातन इमारती असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बांधकामे लाखो वर्षांपूर्वी सोडून देण्यात आली असावीत, असेही सांगण्यात येत आहे. आता एलियन्स चंद्रावर राहत नाही.

यासंदर्भात स्कॉट सी वॉरिंग यांनी ईटी डेटाबेसवर आपल्या सिद्धांताल लिहिले आहेकी, चंद्रावरील काही गोष्टी वस्तू असल्यासारखा भास होतो. मात्र गडद काळ्या रंगाच्या क्षेत्रात अनेक समकोन असतात आणि बांधकामे दिसतात. तसेच चंद्रावरील संरचनांमध्ये काही जहाजे अर्ध्या रस्त्यावरून बाहेर लटकत असल्यासारखी दिसतात. कुठल्यातरी आपत्तीमधून त्यांना सहीसलामत बाहेर पडता आले नसावे, असे वाटते.

चंद्रावरील एलियन्सच्या प्राचीन शहरामध्ये एकादे बंदरही असावे, अशी शक्यताही स्कॉट वर्तवतात. तर अन्य काही शास्त्रज्ञ चंद्रावर अजूनही एलियन्सचे वास्तव्य असल्याचा दावा करतात. मात्र हे सिद्ध करण्यासाठी अद्याप सबळ असा पुरावा मिळालेला नाही.

नासाचे चंद्रावरील मोहिमेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 400 छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ज्यामधील काही फोटो हे धक्का देणारे आहे. या छायाचित्रांना 'द नासा आर्काइव्ह : 60 इयर्स इन स्पेस'मध्येही स्थान देण्यात आले आहे. 1969 मध्ये अपोलो 11 या अंतराळ यानाने 16 जुलै रोजी केनेडी स्पेस सेंटर येथून चंद्राच्या दिशेने उड्डाण केले होते. या यानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी सुमारे 8 दिवस लागले होते.