सावधान ! स्मार्टफोनच्या अतिरिक्त वापरामुळे मुलांवर होताहेत दुष्परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 03:31 PM2019-02-19T15:31:01+5:302019-02-19T15:43:05+5:30

लहान मुले जेव्हा तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून राहू लागतात, तेव्हा त्यांची शारीरिक हालचाल थांबते. त्यांचा शारीरिक विकास मंदावतो, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मेंदूवर विपरित परिणाम होऊ लागतो आणि त्यांची बौद्धिक क्षमतादेखील कमी होऊ लागते. आवश्यक तेव्हा शारीरिक क्रिया करत राहिल्यास लहान मुले लक्ष केंद्रीत करण्यास शिकतात. नवनवीन कौशल्यांचा विकास होऊ लागतो. पण मोबाइलच्या अतिवापरामुळे कौशल्यांचा विकास होण्यास अडथळा निर्माण होतोय.

ज्या मुलांच्या खोलीमध्ये तंत्रज्ञानावर आधारित उपकरणं मोठ्या प्रमाणात असतात, त्या मुलांची शारीरिक हालचाल अतिशय कमी प्रमाणात होते. या मुलांमध्ये लठ्ठपणा वाढण्याचा धोका अधिक असतो. लठ्ठ मुलांमध्ये 30 टक्के मधुमेह, पॅरालीसिस, हृदयरोग होण्याचा धोका असतो.

आपली मुले किती वेळ मोबाइलवर वाया घालवत आहेत, मोबाइलच्या अतिरिक्त वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणाम आणि अन्य नुकसान याकडे बहुतांश आई-वडील दुर्लक्ष करतात. 75 टक्के मुले टेक्नोलॉजीचा अतिरिक्त वापर करताना दिसतात. अधिकतर 9 ते 10 वर्ष वयोगटातील मुलं तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रभावित होतात, अशी माहिती संशोधनाद्वारे समोर आली आहे. यामुळे त्यांच्या झोपेवर परिणाम होतो.

तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त वापरामुळे मुलांमध्ये नैराश्य, चिंताग्रस्त, लक्ष केंद्रीत न होणे, वागणुकीमध्ये सातत्यानं होणारे बदल यांसारख्या मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या वाढत जातात.

बहुतांश वेळेस सोशल मीडिया, टीव्ही, सिनेमे, गेम्समध्ये आपल्याला हिंसक गोष्टी पाहायला मिळतात. हे सगळे पाहून मुलांमधील आक्रमकता वाढते. आजकाल लहान मुले शारीरिक आणि लैंगिक हिंसेचे कार्यक्रम आणि गेम्सकडे सर्वाधिक आकर्षक होत आहेत. यामुळे मुलांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम होत आहे.

सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे मुलांच्या लक्ष केंद्रीत करण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो. यामुळे काही गोष्टीदेखील मुलांच्या लक्षात राहत नाहीत. अभ्यास नीट होत नाही, अभ्यास करताना सातत्यानं अडथळे निर्माण होतात.

कित्येकदा तर आई-वडीलच आपल्या मुलांच्या हातात मोबाइल, स्मार्टफोन्स देतात. मुलांना वेळ देऊ शकत नसल्याच्या कारणामुळे पालक स्वतःच मुलांना तंत्रज्ञानाचा आधार घ्यायला शिकवतात. यामुळे मुलं तंत्रज्ञानाच्या आहारी जातात.

स्मार्टफोन आणि अन्य गॅझेट्सच्या वापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. कारण Back lit Screen तासं-न्-तास पाहत असतात. मुलांची दृष्टी कमजोर होऊ नये, असे वाटत असल्यास त्यांना 30 मिनिटांहून अधिक वेळ स्मार्टफोन वापरू देऊ नका.