योगाभ्यास करताना या गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर सराव पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 03:05 PM2018-06-12T15:05:58+5:302018-06-12T15:05:58+5:30

धकाधकीच्या जीवनात योग्य वेळेत योग्य ते पदार्थ न खाल्ल्यामुळे आपल्या जीवनशैलीवर विपरित परिणाम होतात. आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे तणाव, थकवा, चिडचिड यांसारख्या अनेक समस्या निर्माण होतात. तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक जण जिम, कसरती आणि योगाभ्यास करतात. मात्र योग करण्यापूर्वीचे तुम्हाला काही नियमांचं पालन करावे लागते. त्यामुळ योगासनांचा अभ्यास करताना तुम्ही योग्य ती काळजी घेतली नाही तर फायद्याऐवजी तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही आसनाला सुरुवात करण्यापूर्वी वॉर्म अप करणं गरजेचं आहे. योगासनांपूर्वी स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. यामुळे शरीर लवचिक होण्यास मदत होते.

आसनांचा सराव करताना तहान लागल्यास ठंड पाणी पिऊ नये. योग केल्यानंतर शरीरात ऊर्जा निर्माण होते, यावेळी शरीर गरम होते. त्यामुळे अशा अवस्थेत ठंड पाणी प्यायल्यास सर्दी, शिंका, खोकला आणि अॅलर्जी होण्याची शक्यता आहे.

योगासनांचा अभ्यास करताना सुरुवातीला सोप्या आसनांचा सराव करावा. योगासनांची सुरुवात कधीही कठीण आसनांपासून करू नये. यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते.

योग प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसारच आसनं करावी.

योगासनानंतर लगेचच आंघोळ करू नये. तासाभरानंतरच आंघोळ करावी.

योगाभ्यासादरम्यान मोबाइल वापरू नये. यामुळे एकाग्रता कायम राखता येत नाही.