लिंबू सरबताबरोबर लिंबाच्या रसाचे जाणून घ्या हे ७ फायदे 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 04:26 PM2018-03-22T16:26:55+5:302018-03-22T16:26:55+5:30

मार्च महिना संपत आला असून आता हळूहळू उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. अशा वातावरणात सारखी तहान लागते व सारखं पाणी पिण्याएवजी लिंबू सरबत पिण्याची जास्त इच्छा होते. उन्हाळ्यात लिंबाचे फायदे बरेच आहेत पण फक्त सरबतांपेक्षा इतरही लिंबाचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया 

१) दुपारच्या जेवणानंतर लिंबाचे सरबत प्यायल्याने पचनशक्तीवर ताण येत नाही. तसंच अन्नाचं लवकर पचन होतं आणि आपल्या शरीरातील विषद्रव्यं बाहेर पडण्यास मदत होते. 

२)उन्हाळ्यात घाम मोठ्या प्रमाणावर येतो त्यामुळे शरीरास विशिष्ट प्रकारचा दुर्गंध येतो. म्हणून लिंबाचा रस १५ मिनिटे काखेत किंवा पाठीवर लावा व नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे उन्हाळ्यात कितीही घाम आला तरी दुर्गंध मात्र येणार नाही.

३) उन्हात जास्त वेळ राहिल्यावर चेहऱ्याचा रंग काळसर होतो. म्हणून लिंबाचा रस चेहऱ्यावर १० मिनिटे लावून ठेवा व नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. दिवसातून २ वेळा हे केल्याने चेहरा तजेलदार दिसेल.

४) डोकेदुखीच्या समस्या उन्हाळ्यात खूप जाणवते. त्यामुळे सकाळी उठल्यावर लेमन टी प्यायल्याने आराम मिळू शकेल. 

५) त्वचेचे विकार उन्हाळ्यात फोफावतात म्हणून त्वचा लाल होणे, त्वचेवर मुरूमं येणे अशा विविध समस्यांचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी उठल्यावर लिंबाचा रस संपूर्ण शरीराला चोळून त्यानंतर थंड पाण्याने अंघोळ करा.

६) उन्हाळ्यात कोणतीही फळे किंवा सॅलड खाताना त्यात लिंबाचा समावेश नक्की करा. त्यामुळे तुमच्या आहारात लिंबाचा जास्तीत जास्त समावेश होईल. 

७) लिंबाच्या रसामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो म्हणून उन्हात बाहेर फिरताना तहान लागल्यास कोल्ड्रिंक्स किंवा इतर शीतपेयांपेक्षा लिंबू सरबताला पसंती द्या.