'या' सवयींमुळे तुमच्या आयुष्यातील तब्बल 'पाच' वर्ष होताहेत कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 04:05 PM2019-02-05T16:05:03+5:302019-02-05T16:12:05+5:30

धावपळीच्या आणि स्पर्धेच्या आयुष्यात बहुतांश जणांना सकाळचा नाश्ता करणे शक्य होत नाही. पोषक आहाराची सकाळची पोकळी भरुन काढण्यासाठी अनेक जण दुपारचे जेवण भरपेट करतात. पण यामुळे फायदा होण्याऐवजी तोटाच अधिक होतो. कारण शरीरातील मेटाबॉलिज्‍मचा स्तर कमी होतो. एकाचवेळी भरपूर खाल्ल्यानं शरीरात फॅट्सचे प्रमाणदेखील वाढते. परिणामी अतिरिक्त वजन वाढण्यासही सुरुवात होते. याशिवाय, शरीराला पुरेशी ऊर्जादेखील मिळत नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेस हल्काफुल्का नाश्ता करणे आवश्यक आहे.

पुरेशा प्रमाणात झोप पूर्ण झाल्यास, आपला संपूर्ण दिवस अतिशय चांगला जातो. कारण संपूर्ण दिवस शरीरात ऊर्जा टिकून राहते. पण आजकाल टीव्ही, फोन यांसारख्या उपकरणांमुळे लोकांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे दुसऱ्या दिवशी चिडचिडदेखील होते आणि दिवसभर आळसही भरतो. कारण 5 तासांपेक्षा कमी झोप झाल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे हृदयरोग, रक्तदाब, वजन वाढणे आणि मधुमेह यांसारखे आजार होऊ शकतो. हा धोका लक्षात घेता रात्री 7-8 तासांची झोप घ्यावी. यामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

प्रमाणाबाहेर मद्यसेवन केल्यास अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. नियमित स्वरुपात दारू प्यायल्यास लिव्हर आणि किडनी खराब होतात. हृदयरोग, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होतो.

आधुनिक युगात मनुष्यप्राणी अधिक प्रमाणात तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. त्यामुळे कोणत्याही मेहनतीशिवायच त्याची प्रत्येक कामं सहजासहजी होऊ लागली आहेत. शरीरातून घाम बाहेर पडत नसल्याने विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जात नाहीत. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडावेत, यासाठी नियमित स्वरुपात व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

छोटा-मोठा आजार झाल्यास बऱ्याच जणांना पेनकिलर खाण्याची सवय असते. यामुळे लवकर आराम मिळतो, मात्र याचा शरीरावर दुष्परिणामही तितकाच होतो. त्यामुळे पेनकिलर खाण्याऐवजी घरगुती औषधोपचार करावेत.