हिवाळ्यात या गोष्टी ठेवा आहारात, आरोग्य राहील उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2017 06:02 PM2017-12-01T18:02:46+5:302017-12-01T18:24:57+5:30

डाळींब - हिवाळ्यात डाळींब खाणं खुप उत्तम ठरु शकतं कारण त्यातून शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण राहतं. इतर फळांच्या तुलनेत यात भरपुर अँटीऑक्सीडंट्स असतात त्यामुळे याचा ज्युसही पिणं आरोग्यदायी असतं.

सुका मेवा- आपल्य़ापैकी अनेक जण रोज सकाळी दुधासोबत सुका मेवा खाणं पसंत करतात. त्यातून आपल्या शरीराला ऊर्जा आणि ऊब मिळते. काजू, बदाम, पिस्ता, मनुका, अंजीर, अक्रोड आणि सुकेळी यांचं आहारातील प्रमाण वाढवायला हवं. कारण आपण जे हिवाळ्यात खातो ते वर्षभर आपल्याला ऊर्जा पुरवते.

आंबट फळं - संत्र, मोसंबी, लिंबु अश्या सायट्रीक अॅसिड असणाऱ्या फळांचं सेवन थंडीच्या मोसमात करावं. या मोसमात ते रसरशीत आणि व्हिटामिन सीने परिपुर्ण असतात. ही फळं गुड कॅलेस्ट्रोल वाढवायला आणि बॅड कॅलेस्ट्रोल कमी करायला महत्त्वाची असतात.

बटाटे- रताळी आणि बटाट्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अनेक पोषक तत्त्वे असतात. त्यात व्हिटामिन सी, बी ६ यांचं प्रमाण उत्तम असतं. यातील गुणधर्म गरोदर स्रीच्या आरोग्याला उपयुक्त असतात. त्यात अॅंटीऑक्सिटंड्सचं प्रमाणही भरपुर असतं. याचा स्टार्च आरोग्यदायी असतो.

हिरव्या भाज्या - थंडीच्या मोसमात पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर पिकतात त्यामुळे त्या खाण्यासाठी भरपुर उपलब्ध असतात. हिरव्या रंगाच्या सर्व भाज्या कायम जेवणात ठेवाव्यात. यात व्हिटामिन ए, सी आणि के यांचं प्रमाण पुष्कळ असतं. या भाज्या गरोदर स्त्रीच्या आहारात असल्यास लाभदायक ठरतं.

दुध,दही,तुप - हिवाळ्यात आहारातील दुध आणि दुधापासून बनलेल्या पदार्थांचं प्रमाण वाढवावं. तुप आणि गुळाचा जेवणातील प्रमाण जास्त असल्यास शरीराला त्याचा फायदाच होतो.