भारताच्या वर्ल्ड कप संघात धोनी कशाला हवा?

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला अवघे काही महिने राहिले आहेत. या संघात महेंद्रसिंग धोनीचं असणं गरजेचे आहे की नाही, याबाबत अनेक चर्चा सुरू आहे. कॅप्टन कूल धोनीच्या जागी संघात युवा यष्टिरक्षक रिषभ पंतला संधी देण्यात यावी असा एक मतप्रवाह आहे. पण, धोनीच्या बॅटीतून धावा आटल्या असल्या तरी वर्ल्ड कप संघात त्याचे असणे हे महत्त्वाचे असल्याचे अनेकांचे मत आहे. धोनी संघात कशाला हवा, याची उत्तर जाणून घेऊया...

धोनीच्या गळ्यात कर्णधाराची माळ नसली तरी संघासाठी तो एक उत्तम मार्गदर्शक आहे. असा मार्गदर्शक संघाबाहेर असण्यापेक्षा मैदानात असणे कधीही उत्तम. कर्णधार विराट कोहली हा चांगला कर्णधार आहे, परंतु कठीण समयी त्यालाही मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि अशा वेळी धोनी हा पर्याय त्याच्याकडे उरतो.

यष्टिमागून प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या हालचालींवर नजर ठेवून सहकारी गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची भूमिका धोनी उत्तमपणे वठवतो. विशेषतः फिरकी गोलंदाजांना धोनीचे मार्गदर्शन बहुपयोगी ठरते आणि त्यांच्या वाट्याला यशही येते. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे व ट्वेंटी-20 मालिकेत त्याची प्रचिती आली.

अनुभव हा फॅक्टर वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाच्या फायद्याचा ठरणार आहे. सध्याच्या संघात धोनीइतका अनुभवी एकही खेळाडू नाही आणि भारताला वर्ल्ड कप विजयाची चव चाखायची असल्यास धोनीच्या अनुभवाचा फायदा उचलायलाच हवा.

धोनीच्या धावांचा ओघ आटला, त्याची फलंदाजी संथ झाली... अशी टीका करणाऱ्यांना माहीने आपल्या कामगिरीतूनच उत्तर दिलेले आहे. त्याच्या फुटवर्कमधील उणीवा प्रकर्षाने जाणवत असल्या तरी सलामीची फळी अपयशी ठरल्यास संघासाठी एक बाजू लावून धरणारा खेळाडू असणे आवश्यक आहे आणि धोनी त्यात एकदम फिट बसतो. त्याच्यातला मॅच फिनिशर अजूनही कायम आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे यष्टिमागील धोनीच्या चपळतेला तोड देणारा खेळाडू तयार होणे नाही. यष्टिमागील त्याची भूमिका वठवणे कोणालाही जमणे सहज शक्य नाही. त्यामुळे वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत रिषभ पंतला संधी देऊन जोखीम उचलण्याचे धाडस न केलेलेच बरे.

DRS अर्थात डिसिजन रिव्ह्यू सिस्टम आणि आता त्याला धोनी रिव्ह्यू सिस्टम या नावानेही ओळखले जाते. सामन्यात DRS घ्यायचा झाल्यास कोहलीची पहिली धाव ही धोनीकडेच असते आणि त्याचा अनेकदा संघाला फायदा झाला आहे.