विक्रमवीर विराट; कोहलीचे 'हे' एक डझन विक्रम सांगतात त्याची महानता!

आजच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून भारताचा कर्णधार विराट कोहलीचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. वनडे क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा 'विराट' पल्ला गाठण्यासाठी तो सज्ज आहे. या निमित्तानेच एक नजर त्याच्या १२ विक्रमांवर....

कसोटी क्रिकेटमध्ये सलग तीन वर्षं १ हजार धावा करणारा पहिलाच कर्णधार

वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून विराटनं सर्वात जलद ३ हजार धावा पूर्ण केल्या. ४९ डावांत हा टप्पा ओलांडून त्यानं एबी डिविलियर्सला मागे टाकलं.

कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगानं ४ हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा पराक्रम विराटनं केला. वेस्ट इंडिजचा तडाखेबंद वीर ब्रायन लारानं ७१ कसोटी डावांमध्ये ४ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराटनं हा पल्ला ६५ डावांमध्ये गाठला.

एका कसोटीत (दोन डावांत मिळून) १० वेळा २०० धावा करणारा कोहली हा एकमेव फलंदाज आहे. रिकी पॉन्टिंग आणि ब्रायन लारानं प्रत्येकी सात वेळा ही किमया केली होती.

दोन देशांमधील मालिकेत विराटनं सहा वेळा ३०० पेक्षा जास्त धावा केल्यात. हे अन्य कुणालाही जमलेलं नाही.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीच्या नावावरही एक विक्रम आहे. वनडे क्रिकेटमध्ये या दोघांनी चार वेळा द्विशतकी भागीदारी रचलीय.

विराट कोहलीने १९४ वनडे डावांत ९ हजार धावा पूर्ण केल्या. हा पल्ला गाठण्यासाठी एबी डिविलियर्सला २०५ इनिंग्ज लागल्या होत्या.

सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक झळकावण्याचा भीमपराक्रम कोहलीनं करून दाखवलाय. राहुल द्रविड आणि सर डॉन ब्रॅडमन यांनी सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक केलं होतं.

विराटने टी-२० मध्ये सर्वात वेगाने २ हजार धावा पूर्ण केल्यात.

लक्ष्याचा पाठलाग करताना १८ शतकं ठोकून विराटनं सचिन तेंडुलकरचा १७ शतकांचा विक्रम मोडलाय.

कसोटीच्या सलग तीन डावांमध्ये शतक साजरं करण्याची किमयाही विराटनं केलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेड कसोटीत त्यानं दोन्ही डावांमध्ये शतक झळकावलं आणि लगेचच सिडनी कसोटीच्या पहिल्या डावातही शतकी खेळी साकारली.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या खात्यात ३५ शतकं आहेत. या यादीत ४९ शतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे.