विराटच्या अंगावर नऊ टॅटू; प्रत्येकामागे आहे एक खास गोष्ट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. वन डे आणि कसोटीच्या जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे. त्याने नुकतीच क्रिकेट कारकिर्दीतील दहा वर्षे पूर्ण केली. या कारकिर्दीत त्याने आपल्या अंगावर नऊ टॅटू काढले आहेत आणि त्या प्रत्येकामागे एक खास गोष्ट आहे. नॅशनल जिओग्राफिक चॅनेलने तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीत विराट कोहलीने या टॅटूंमागच रहस्य उलगडलं आहे.

विराटने डाव्या हाताच्या मागच्या बाजूला आईचे (सरोज) नाव हिंदीत गोंदवून घेतले आहे.

उजव्या हाताच्या मागच्या बाजूला वडील प्रेम यांचेही नाव त्याने गोंदवले आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विराटने अथक परिश्रम घेतले.

भगवान शंकराचा भक्त असलेल्या विराटने उजव्या हातावर कैलास पर्वतावर ध्यानस्थ शंकराचे चित्र रेखाटले आहे.

डाव्या हातावर शांति आणि शक्तीचे प्रतीक म्हणून मठाच टॅटू काढला आहे.

2008 मध्ये विराटने वन डे सामन्यात पदार्पण केले होते. भारताकडून वन डे सामन्यात पदार्पण करणारा तो 175 वा खेळाडू आहे आणि त्याने त्याचाही टॅटू केला आहे.

तीन वर्षांनंतर त्याने कसोटीत पदार्पण केले आणि तो 269 खेळाडू होता. तोही आकडा त्याने अंगावर गोंदवला आहे.

विराटने मनगटावर आदिवासी कलांचे चित्रही रेखाटले आहे. ते आक्रमकतेचे प्रतिक मानले जाते.

विराटच्या उजव्या हातावर स्कॉर्पिओ (विंचू) असे इंग्रजीत लिहिले आहे. विराटचा जन्म हा नोव्हेंबर महिन्यातला आणि हा महिना वृश्चिक राशीचा समजला जातो.

डाव्या हातावर त्याने योद्ध्याचे टॅटू काढले आहे. या जपानी योद्ध्याच्या हातात तलवार आहे. या टॅटूला विराट गुडलक मानतो.

उजव्या खांद्यावर शक्तीचा प्रतिक असलेल्या 'गॉर्ड्स आय'चा टॅटू आहे.

विराटने ॐ चाही टॅटू गोंदवला आहे. ( ही सर्व छायाचित्रे नॅशनल जिओग्राफिक चॅनलच्या डॉक्युमेंट्रीतून घेतलेली आहेत)