U-19 World Cup 2018 : 'हे' आहेत भारताच्या पाकवरील विजयाचे शिल्पकार

विजयोत्सव... अंडर-19 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 203 धावांनी धुव्वा उडवला.

शुभमन गिल... टीम इंडियाचा तडाखेबंद फलंदाज शुभमन गिल सध्या भलताच फॉर्मात आहे. त्याची बॅट आज चांगलीच तळपली. पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करत त्यानं 94 चेंडूत नाबाद 102 धावांची खेळी केली आणि तिथेच भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. त्याच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियानं 272 धावांपर्यंत मजल मारली.

ईशान पोरल... शुभमनने रचलेल्या पायावर विजयाचा कळस चढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ती जलद गोलंदाज ईशान पोरल याने. सहा षटकांत 17 धावांच्या मोबदल्यात त्यानं पाकच्या चौकडीला तंबूत धाडलं. त्याच्या या झंझावाती कामगिरीमुळे पाकिस्तानचा 69 धावांत खुर्दा पडला.

पृथ्वी-मनजोतची जोडी जमली... टीम इंडियाचा कर्णधार सलामीवीर पृथ्वी शॉनं 41 धावांची, तर मनजोत कालरानं 47 धावांची खेळी करून भारताला भक्कम सुरुवात करून दिली.

द्रविडचा गुरूमंत्र... टीम इंडियाची 'द वॉल' म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड 19 वर्षांखालील टीम इंडियाचा प्रशिक्षक आहे. संघाच्या यशस्वी वाटचालीत त्याचं मोठं योगदान आहे. द्रविडचं तंत्र आणि त्याच्याकडून मिळणारा मंत्र भारताच्या या यंग ब्रिगेडला जेतेपदही मिळवून देऊ शकतो.