निर्णायक टी-२० सामन्यात भारताचा मालिकेसह रोमांचक विजय

तिरुवनंतरपुरम : फलंदाजांच्या समाधानकारक कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून मा-याच्या जोरावर भारताने निर्णायक टी२० सामन्यात न्यूझीलंडचा ६ धावांनी पराभव केला.

या रोमांचक विजयासह भारताने तीन टी२० सामन्यांची मालिकाही २-१ अशी जिंकली. प्रत्येकी ८ षटकांचा खेळविण्यात आलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ बाद ६७ धावा काढल्या.

भारताने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने ६ बाद ६१ धावांची मजल मारली.

पावसाच्या व्यत्ययामुळे आजचा टी-20 सामना उशिरा खेळविण्यात आला. हा सामना 8-8 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

या सामन्यात भारताला मर्यादित धावसंख्येमध्ये रोखल्यानंतर न्यूझीलंड बाजी मारणार अशी चिन्हे होती. मात्र, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी अपेक्षेप्रमाणे टिच्चून मारा करत सामन्याचे चित्र पालटले.