टीम इंडियाचा विजयी चौकार, चौथ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा

पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने चार सामन्यांत सलग विजय मिळवत मालिकेवर वर्चस्व मिळवलं आहे.

कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजांच्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने चौथ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा १६८ धावांनी धुव्वा उडवला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत ५ बाद ३७५ धावांचा एव्हरेस्ट उभारला होता. भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेचा डाव ४२.४ षटकांत २०७ धावांमध्ये संपुष्टात आला.

माजी कर्णधार अ‍ॅन्जोलो मॅथ्यूज (७0) शिवाय श्रीलंकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. घरच्या मैदानावर लंकेचा हा सर्वांत मोठा पराभव ठरला.

विराट कोहलीने ९६ चेंडूंत १७ चौकार व २ षटकारांसह १३१ धावांची खेळी करताना कारकिर्दीतील २९वे शतक पूर्ण केले. यासह सर्वाधिक शतके झळकावणाºया फलंदाजांच्या यादीत त्याने तिसरे स्थान पटकावले.

सर्वाधिक शतक ठोकण्याच्या क्रमवारीत कोहलीपुढे सचिन तेंडुलकर (४९) आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग (३०) आहेत. विशेष म्हणजे कोहलीने केवळ १८५ व्या डावात ही कामगिरी केली. तसेच, या वेळी कोहलीने श्रीलंकेविरुद्ध दोन हजार धावांचा पल्लाही गाठला. त्याने ४४ डावांमध्ये ही कामगिरी केली.

विराट कोहलीने रोहितसह (१०८) दुस-या विकेटसाठी २१९ धावांची भागीदारी केली. रोहितने ८८ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार व ३ षटकार ठोकले.

धोनीसाठी हा सामना विशेष होता. कारण हा त्याच्या कारकिर्दीतील 300 वा एकदिवसीय सामना होता. महेंद्रसिंह धोनीने मनिष पांडेच्या साथीने सहाव्या विकेटसाठी वेगवान शतकी भागीदारी करून अखेरच्या १२.२ षटकांत १०१ धावा वसूल केल्या.

दुसरीकडे, शतकवीर कोहलीला बाद करुन मलिंगाने आपल्या बळींचे त्रिशतक पूर्ण केले. दिग्गज मुथय्या मुरलीधरननंतर (५३४) अशी कामगिरी करणारा तो श्रीलंकेचा दुसरा, तर जगातील एकूण १३ वा गोलंदाज ठरला.