श्रीलंकेच्या दिग्गज गोलंदाजाचं 'Valentine's Day'शी खास नातं

श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज चामिंडा वाससाठी 14 फेब्रुवारी अर्थात 'Valentine's Day'शी खास नातं आहे. याच दिवशी 2003 मध्ये त्याने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत सामन्याच्या पहिल्याच तीन चेंडूंवर विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता.

विशेष म्हणजे सामन्याच्या पहिल्या तीन चेंडूंवर हॅटट्रिक घेण्याचा विक्रम हा वासच्याच नावावर आहे. डावखुऱ्या मध्यमगती गोलंदाजाने बांगलादेशविरुद्ध हा विक्रम नोंदवला होता.

2003च्या वर्ल्ड कपमध्ये सनथ जयसूर्याच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वासने पहिल्याच षटकात बांगलादेशच्या चार फलंदाजांना माघारी पाठवले. त्याने पहिल्या तीन चेंडूंवर हानन सरकार, मोहम्मद अशरफुल आणि एहसान उल हकला बाद केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने सनवर हुसैनला पायचीत केले.

दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात बांगलादेशचा संपूर्ण संघ 124 धावांत तंबूत परतला होता. त्यात वासने 9.1 षटकांत 25 धावा देत 6 विकेट घेतल्या होत्या. श्रीलंकेने 21.1 षटकांत एकही विकेट न गमावता 126 धावा केल्या. अटापट्टू व जयसूर्या यांनी अर्धशतकी खेळी केली.

त्यावेळी वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक घेणारा तो तिसरा गोलंदाज होता. भारताच्या चेतन शर्माने 1987 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या सॅकलेन मुश्ताकने 1999 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हा पराक्रम केला.

45 वर्षीय वासने 322 वन डे सामन्यात 2025 धावा केल्या, तर 400 विकेट घेतल्या. 111 कसोटीत त्याने 3089 धावा केल्या व 355 विकेट घेतल्या.