श्रीलंकेनं रचला इतिहास!

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा श्रीलंका हा पहिलाच आशियाई देश ठरला आहे. आशिया खंडातील संघांनी येते 18 कसोटी मालिका खेळल्या आणि त्यापैकी 16मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला, तर दोन मालिका अनिर्णीत राहिल्या. श्रीलंकेचा येथे सहा कसोटी मालिकेतील हा पहिलाच विजय ठरला.

दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम तीनच संघांना करता आलेला आहे. यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने येथे कसोटी मालिका जिंकल्या आहेत.

श्रीलंकेच्या संघातील खेळाडूंचा कसोटी खेळण्याचा अनुभव हा दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंपेक्षा निम्म्याहून कमी होता. श्रीलंकेच्या संघातीच खेळाडूंनी एकूण 242 कसोटी खेळले, तेच आफ्रिकेच्या खेळाडूंनी एकूण 555 कसोटी खेळले आहेत. श्रीलंकेच्या सध्याच्या संघातील खेळाडूंच्या नावावर एकूण 21 शतकं आहेत, तर आफ्रिकेच्या हाशिम आमलाच्या नावावर 28 शतकं आहेत.

आशिया खंडाबाहेर श्रीलंकेने प्रथमच एकापेक्षा अधिक कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंकेने आफ्रिकेत 23 कसोटी सामन्यांत केवळ एकच विजय मिळवला होता.

दक्षिण आफ्रिकेची घरच्या मैदानावरील सलग 7 कसोटी मालिका विजयाची मालिका खंडीत झाली. इंग्लंडने 2015-16 मध्ये आफ्रिकेला त्यांच्याच घरी पराभूत केले होते.

दक्षिण आफ्रिकेला 1994 नंतर प्रथमच आठ किंवा त्यापेक्षा अधिक विकेटने पराभव पत्करावा लागला.

कुशल मेंडिस आणि ओशाडा फर्नांडो यांची नाबाद 163 धावांची भागीदारी ही धावांचा पाठलाग करतानाची दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. याआधी 1998 मध्ये अरविंद डी सिल्वा आणि अर्जुन रणतुंगा यांनी 189 धावांची भागीदारी केली होती.