सत्तर वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या ब्रॅडमन यांचे हे विक्रम आहेत अबाधित

क्रिकेटमधील सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाज अशी गणना होणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांना निवृत्त होऊन 70 वर्षे झाली. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी नोंदवलेले अनेक विक्रम अद्यापही अबाधित आहेत. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात क्रिकेटविश्व गाजवणाऱ्या ब्रॅडमन यांच्या अनेक विक्रमांच्या आसपासही जाणे नंतरच्या फलंदाजांना शक्य झालेले नाही. ब्रॅडमन यांच्या अद्याप अतूट राहिलेल्या विक्रमांचा घेतलेला हा आढावा.

99.94 सरासरी - बॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 99.94 च्या सरासरीने 6996 धावा फटकावल्या. ब्रॅडमन यांचा सरासरीच्या या विक्रामाच्या आसपासही कुठल्या फलंदाजाला पोहोचता आलेले नाही.

एका दिवसात त्रिशतक - डॉन ब्रॅडमन यांनी 1930 च्या अॅशेस मालिकेतील एका कसोटी सामन्यामध्ये एका दिवसात त्रिशतक फटकावण्याची किमया साधली होती. हा विक्रमही अद्याप अबाधित आहे.

12 द्विशतके - सर डॉन ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 12 वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला. त्यांचा हा विक्रमसुद्धा अद्याप अबाधित आहे.

एकाच संघाविरुद्ध 5 हजार धावा - कसोटी क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध पाच हजारहून अधिक धावा फटकावणारे ब्रॅडमन हे एकमेव फलंदाज आहेत. ब्रॅ़डमन यांनी इंग्लंडविरुद्ध एकूण 5 हजार 28 धावा फटकावल्या.

एकाच संघाविरोधात सर्वाधिक शतके - एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके फटकावण्याचा विक्रमही ब्रॅडमन यांच्या नावे आहे. ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्ध 19 शतके फटकावली होती.

कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा - एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा फटकावण्याचा विक्रमही ब्रॅडमन यांच्या नावे आहे. 1930 च्या अॅशेस मालिकेत ब्रॅडमन यांनी 974 धावा फटकावल्या होत्या.

पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक सरासरी - ब्रॅडमन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत 201.50 च्या सरासरीने 806 धावा फटकावल्या होत्या.