2023च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात दिसतील 'हे' सात युवा खेळाडू!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे वर्ल्ड कप 2019 स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. जेतेपदाच्या निर्धाराने लंडनमध्ये दाखल झालेल्या भारतीय संघाचे स्वप्न उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भंग झाले. पण, हा पराभव मागे सोडून चार वर्षांनंतर होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी आतापासूनच करायला हवी.

2023ची वर्ल्ड कप स्पर्धा भारतातच होणार आहे आणि आपल्या घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकण्याची पुन्हा एक संधी टीम इंडियाला मिळणार आहे. पण, या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात नवीन स्टार खेळाडू पाहायला मिळतील. सध्याच्या संघातील बरेच खेळाडू कदाचित पुढील वर्ल्ड कपमध्ये दिसणारही नाही. अशाच पाच प्रतिभावान युवा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया...

शुबमन गिल - या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. पंजाबच्या या खेळाडूनं स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा कुटल्या आहेत. पंजाबच्या कनिष्ठ स्थरावरील क्रिकेट स्पर्धांमध्ये सातत्यानं धावा करण्याचा पराक्रम गिलनं केला आणि त्यामुळेच त्याला भारताच्या 19 वर्षांखालील संघात संधी मिळाली होती. भारताच्या 19 वर्षांखालील संघाच्या वर्ल्ड कप विजयात गिलचा मोठा वाटा आहे.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्यानं भारतीय संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पण, त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण, येणाऱ्या काळात तो संघातील एक प्रमुख खेळाडू असेल, हे नक्की.

श्रेयस अय्यर - भारतीय संघ मधल्या फळीसाठी सक्षम पर्यायाच्या शोधात आहे आणि मुंबईकर श्रेयस अय्यर हा त्यांच्यासमोर असलेला योग्य खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे आणि विराटच्या पुनरागमनानंतर तो पाचव्या क्रमांकावरही खेळला आहे.

त्यानं सहा आंतरराष्ट्रीय वन डे आणि ट्वेंटी-20 सामन्यांत 293 धावा केल्या आहेत. परंतु त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईकडून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नेतृत्वाची धुराही त्यानं सक्षमपणे सांभाळली आहे.

खलील अहमद - झहीर खान आणि आशीष नेहर यांच्यानंतर भारतीय संघ डावखुऱ्या जलदगती गोलंदाजांचा शोध घेऊ शकलेला नाही. बरिंदर सरनला संधी मिळाली होती, परंतु केवळ 8 सामन्यांत तो टीकू शकला. त्यानंतर खलीलने भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. राजस्थानच्या या खेळाडूनं 2016मध्ये 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धा खेळली होती आणि त्यानंतर 2017मध्ये त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गतवर्षी आशिया चषक स्पर्धेत त्यानं भारताच्या वरिष्ठ संघातून पदार्पण केले आणि आपल्या कामगिरीनं त्यानं सर्वांना प्रभावित केले.

2019च्या वर्ल्ड कप स्पर्धेत तिसरा जलदगती गोलंदाज म्हणून खलीलच्या नावाची चर्चा सुरु होती. पण, मोहम्मद शमीनं स्थान पटकावत या चर्चांना पूर्णविराम लावला.

नवदीप सैनी - भारतात सध्याच्या घडीला युवा जलदगती गोलंदाजांमध्ये नवदीप सैनी हे नाव आघाडीवर आहे. त्यानं 2013मध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तो सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यानं अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी समनाही खेळला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत राखीव गोलंदाज म्हणून सैनीचा समावेश करण्यात आला होता.

सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचे तो प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यानं पाच विकेट्सही घेतल्या आहेत.

श्रेयस गोपाळ - कर्नाटकच्या या गोलंदाजाने स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. आयपीएलमध्येही श्रेयसच्या फिरकीसमोर दिग्गजांनाही अपयश आल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवाय फलंदाज म्हणूनही तो उपयक्त ठरू शकतो.

दीपक चहर - 26 वर्षीय गोलंदाजाच्या लाईन व लेंथने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यानं यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत तिसरा क्रमांक पटकावला होता. त्यानं 7.47च्या इकॉनॉमीनं 22 विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही ( 2017-18) सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत तो अव्वल होता.

पृथ्वी शॉ - 19 वर्षांखालील वर्ल्ड कप विजयानंतर पृथ्वी शॉनं सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं 6 सान्यांत 65.25च्या सरासरीनं 261 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यानं 2018च्या आयपीएल स्पर्धेतही 9 सामन्यांत 245 धावा केल्या. 2019च्या आयपीएलमध्ये त्यानं 352 धावा चोपल्या. 2018मध्ये त्यानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतून भारतीय संघाकडून पदार्पण केले आणि पहिल्याच डावात शतकी खेळी करून इतिहास घडवला.