रोहित शर्मा-विराट कोहलीची जोडी जमली

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्याच वन डे सामन्यात जोरदार फटकेबाजी केली. या जोडीने त्या सामन्यात अनेक विक्रम नोंदवले. सध्याच्या वन डे क्रिकेटमध्ये विराट आणि रोहित ही सर्वाधिक खतरनाक जोडी असल्याचे सिद्ध होत आहे.

वन डे क्रिकेटमध्ये रोहित आणि विराट या जोडीने पाचवेळा द्विशतकी भागीदारी केली आहे. यानंतर विराट व गौतम गंभीर, सचिन तेंडुलकर व सौरव गांगुली आणि महेला जयवर्धने व कुमार संगकारा या जोडीने प्रत्येकी 3 वेळा द्विशतकी भागीदारी केली आहे.

विंडीजविरुद्ध रोहित-विराटने 246 धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून झालेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.

रोहित आणि विराट यांच्यात 15 शतकी भागीदारी आहेत. आत्तापर्यंत केवळ सहाच जोडींना अशी कामगिरी करता आलेली आहे आणि त्यातील सध्या खेळत असलेली रोहित-विराट ही एकमेव जोडी आहे.

तेंडुलकर-गांगुली यांच्या नावावर सर्वाधिक 26 शतकी भागीदारी आहेत. त्यापाठोपाठ तिलकरत्ने दिलशान-कुमार संगकारा ( 20), अॅडम गिलख्रिस्ट-मॅथ्यू हेडन ( 16), गॉर्डन ग्रिनिच-डेसमंड हँस आणि महेला जयवर्धने-संगकारा ( प्रत्येकी 15) यांचा क्रमांक येतो.

रोहित-विराट यांच्या नावावर एकूण 3931 धावा आहेत. वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून यशस्वी जोडींमध्ये रोहित-विराट सातव्या क्रमांकावर येतात. या क्रमवारीत तेंडुलकर-गांगुली ( 8277) आघाडीवर आहेत.

भारताने जिंकलेल्या 37 सामन्यांत रोहित-विराट या जोडीची फलंदाजीची सरासरी 84.1 अशी आहे.